रत्नागिरी:- नवेदरवाडी-नेवरे येथील महिला नदीवर कपडे धुण्यासाठी गेली होती. तिला चक्कर येऊन ती पाण्यात पडली. तत्काळ उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.
अनुष्का नंदकुमार रसाळ (वय ३३, रा. नवेदरवाडी- नेवरे, ता. रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. २८) सकाळी साडे अकराच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनुष्काला चक्कर येण्याची सवय होती. बुधवारी नेहमी प्रमाणे सकाळी परिसरातील नदीवर कपडे धुण्यासाठी गेली होती. अकरा वाजेपर्यंत परत घरी आली नाही म्हणून पती नंदकुमार हे बघण्यासाठी नदीवर गेले असता ती नदीच्या पाण्यात पडलेली दिसून आली. तत्काळ त्यांनी उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी नंदकुमार रसाळ यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली. खबरीवरुन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.