नवीन बसस्थानकाचे काम कासवगतीने 

एसटी प्रशासन, ठेकेदारात समन्वयाचा अभाव 

रत्नागिरी:- एसटी बसस्थानकाच्या नूतन इमारतीच्या हायटेक प्रकल्पाचे काम कोरोनानंतर सुरू करण्यात आले; मात्र आजही हे काम रडतखडत सुरू आहे. प्रत्यक्षात कामाला कोणतीही गती दिसत नाही. कामाच्या ठिकाणी कामगार दिसत नाहीत. काम सुरू नसले तरी एसटी महामंडळाच्या अधिकार्‍यांकडून हे काम सुरू असल्याचा दावा करून वेळ मारून नेत असल्याचा प्रकार सुरू असल्याची चर्चा
आहे.

एसटी बसस्थानकाच्या नूतन इमारतीच्या हायटेक प्रकल्पाला कोरोनाचा फटका बसला होता. रेंगाळलेल्या या कामाला गती देण्याच्यादृष्टीने हालचाली झाल्या. परंतु मार्चमध्ये कोरोना महामारीमुळे कामाला ब्रेक लागला. कामगार मिळेनासे झाले आणि कामगार आणण्याचे धाडस केले तर ठेकेदाराचे थकलेले 40 लाखाचे बिल मिळेना. त्यामुळे 10 कोटीचा नूतन बसस्थानकाचा प्रकल्प अनिश्‍चित कालावधीसाठी
थांबला. आराखड्यामध्ये काही त्रुटी निघाल्याने सुरवातीलाच कामाला खो मिळाला. शॉपिंग सेंटर किंवा व्यापारी गाळे आत ठेवण्याऐवजी दर्शनी भागी उभारून एसटी आत आणि बाहेर जाण्यासाठी मार्ग करण्याचे सुचविण्यात आले. नवीन आराखडा करून प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ झाला. कोल्हापूरच्या ठेकेदाराला याचा ठेका देण्यात आला. सुरवातीला काम चांगल्या पद्धतीने सुरू होते परंतु त्यानंतर रेंगाळत गेले. यामुळे एसटी वाहतूक व्यवस्थेवरून बदल करण्यात आल्याने वाद निर्माण झाले. प्रवाशांना निवारा शेडचीही व्यवस्था नव्हती तसेच बसस्थानकासमोरील थांब्यावर प्रवाशांची गर्दी होऊन अपघाताची शक्यता निर्माण झाली. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी यात लक्ष घालून ठेकेदाराची कानउघाडणी केली. त्यानंतर कामाला गती मिळाली.

परंतु कोरोना महामारीचे संकट आले आणि कामाला पुन्हा खो मिळाला. जेवढे कामगार होते ते कोरोनाच्या भीतीने निघून गेले तसेच ठेकेदाराने केलेल्या कामाचे सुमारे 40 लाखाचे बिलदेखील एसटी महामंडळाकडून अडकले होते. गेल्या महिन्यातच बसस्थानकाचे रखडलेले काम सुरू झाले; मात्र त्याला अपेक्षित गती मिळालेली दिसत नाही. एसटी महामंडळ काम सुरू आहे, म्हणून सांगितले आहे. प्रत्यक्षात कामाच्या ठिकाणी तसे काहीच दिसत नाही तर कामगार रजेवर गेले असावे, असे एसटीकडून सांगितले जात आहे. त्यामुळे नवीन बसस्थानकाचे काम सुरू आहे की नाही, यावरच संशय व्यक्त होत आहे.