नवरात्रोत्सवातील निर्जल उपवास बेतला तरुणीच्या जीवावर

चिपळूण:- नवरात्रोत्सवामध्ये निर्जल उपवास करण्याची परंपरा आहे. मात्र, हा उपवास एका तरुणीच्या जीवावर बेतला आहे. चिपळूण तालुक्यात ही घटना घडली आहे.

नऊ दिवस उपवास सुरू असतानाच अचानक या तरुणीला श्वासोच्छवास घेण्यास त्रास होऊ लागला आणि छातीत दुखू लागले. यावेळी तिला दवाखान्यात दाखल करण्यात आले असता उपचारदरम्यान डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

पायल कालिचरण राजपूत (१६, रा. बाळकृष्ण नगर बहादूरशेख नाका, चिपळूण) असे या तरुणीचे नाव आहे. या बाबत तिच्या भावाने चिपळूण पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. ही घटना दि. २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.४५ वा. कामथे रुग्णालयात घडली.

या घटनेत प्राण गमावलेल्या पायल हिने नवरात्रीचे उपवास धरले होते. तिचे उपवास सुरू असतानाच अचानक तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तसेच तिच्या छातीत दुखू लागले. उपचाराकरिता तिला कामथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारदरम्यान तिचा मृत्यू झाला. त्यामुळे नवरात्रीचे उपवास तरुणीच्या जीवावर बेतले आहेत.