नळपाणी योजनेच्या दुरुस्तीचा खर्च ठेकेदाराच्या बिलातून वसूल करणार

रनप प्रशासनाचा निर्णय 

रत्नागिरी:- शहराच्या नवीन नळपाणी योजनेच्या अंदाजपत्रकातील कामांपेक्षा अतिरिक्त कामे करावी लागली आहेत. या वाढीव कामांचे सुमारे 3 कोटी रूपये आणि अंदाजपत्रकातील कामांचे 16 कोटी रूपये ठेकेदार कंपनीला मिळालेले नाहीत. दीड वर्षापूर्वी या योजनेतून शहरवासियांना पाणी पुरवठा सुरू झाला. त्यानंतर आता या योजनेच्या कामाची चौकशी करण्यासाठी तक्रारी झाल्या आहेत. त्याचबरोबर जो काही बिघाड होत आहे त्याचा खर्च ठेकेदार कंपनीच्या राहिलेल्या बिलातून वसूल केला जाणार असल्याचे पाणी विभागाकडून सांगितले जात आहे. त्यामुळे यावेळीही न्यायालयीन लढाई होण्याची शक्यता आहे.

रत्नागिरी नगर परिषदेच्या नवीन नळपाणी योजनेचा आराखडा अपुरा होता. त्यात अनेक कामे वाढली गेली. याचा वाढीव खर्च मिळण्यासाठी अन्वी कन्स्ट्रक्शन कंपनीने न्यायालयीन लढाई केली. यामध्ये प्रत्यक्ष कामाला वेळ झाला आणि वाढीव खर्चही ठेकेदार कंपनीला द्यावा लागला. त्यानंतरही कामे वाढत गेली. अंतर्गत जलवाहिनीचे काम 59 कि.मी.ने वाढले. 4 इंचीच्या चाव्या 296 ने वाढल्या. सदोष निविदेमुळे सुमारे 60 टक्के वाढीव जलवाहिनी अंथरावी लागली. पानवल धरणाकडून येणार्‍या जलवाहिनीची लांबी वाढली गेली. पाठोपाठ कोरोना संकट अशा या कारणांमुळे ही योजना पूर्ण होण्यात अडथळे निर्माण झाले. जे वाढीव काम झाले त्याचे बिल नगर परिषदेने पूर्णपणे अदा केलेले नाही.
ठेकेदार कंपनीला सुमारे 48 कोटी रूपये या योजनेच्या कामांच्या बिलापोटी मिळाले आहेत. अजून योजनेच्या अंदाजपत्रकातील 16 कोटी रूपये आणि वाढीव कामांचे 3 कोटी रूपये रत्नागिरी नगर परिषद ठेकेदाराला देणे बाकी आहे. त्यामुळे ठेकेदार कंपनी आर्थिक अडचणीत आली आहे. आधीच नगर परिषद आर्थिक अडचणीत असून, या योजनेचा निधीही नसल्याने नगर परिषद बिले देऊ शकत नाही. अशा या परिस्थितीत या योजनेची स्वतंत्र अशा तांत्रिक संस्थेकडून चौकशी करण्याची मागणी होत आहे.
योजनेतील कामांच्या बिघाडाला येणारा खर्च नगर परिषद ठेकेदाराकडून वसूल करणार असे सांगत आहे. त्यामुळे हा वाद पुन्हा एकदा न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.