नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची अंमलबजावणी; चार महिन्यांनी मिळणार दोन हजारांचा लाभ

रत्नागिरी:- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या कार्यपध्दतीत सुधारणा करण्याचा आणि अंदाजपत्रकीय अधिवेशनात जाहीर केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारच्या योजनेत राज्य सरकार आणखी सहा हजारांची भर घालणार असून जुलैपासून दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होणार आहेत.

पहिला हप्ता एप्रिल ते जुलै 2000 रुपये, दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर 2000 रुपये, तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च 2000 रुपये या योजनेतून प्रति वर्ष 6 हजार रुपये (दर चार महिन्यांनी दोन हजार) पात्र लाभार्थींच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येईल. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत पी. एम. किसान पोर्टलवर नोंदणी करणे व पात्र लाभार्थीना मान्यता देण्यासंदर्भात कार्यपद्धतीत सुधारणा करण्यात आली. संनियंत्रणासाठी ग्रामस्तरीय, तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय, तसेच राज्यस्तरीय समित्या देखील नियुक्त करण्यात आल्या आहेत. प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत सहा हजार रुपये वर्षाकाठी मिळत असलेल्या राज्यातील शेतकर्‍यांना आता आणखी सहा हजार रुपये असे एकूण 12 हजार रुपये मिळतील. त्यासाठीच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेस राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली. 1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना या योजनेचा फायदा होणार आहे. या योजनेपोटी राज्य सरकारला 2023-24 या आर्थिक वर्षात 6 हजार 900 कोटी रुपये खर्च येणार आहे.
राज्यातील शेतकर्‍यांसाठी देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्‍यांना 1 रुपयात पीक विमा देण्याची घोषणा केली होती. शेतकर्‍यांच्या वतीने पीक विम्याचा हप्ता राज्य सरकार भरणार आहे. शेतकर्‍यांनी या योजनेचे स्वागत केले आहे.