रत्नागिरी:- काजू बागेला लागेला वणवा विझविण्याचा प्रयत्न करताना गोविंद विश्राम घवाळी (वय ६५, रा.हातखंबा तारवेवाडी) या वृद्धाचा होरपळून मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली. गोविंद घवाळी यांच्या अपघाती मृत्यूने हातखंबा गावावर शोककळा पसरली आहे.
तालुक्यातील हातखंबा तारवेवाडी येथील गोंविद घवाळी नेहमीच काजू बागेची देखभाल व पाणी देण्यासाठी जात असत. मंगळवारी ते नेहमीप्रमाणे आपल्या काजूच्या बागेत गेले होते. घवाळी यांच्या काजू बागेशेजारी असलेल्या बागेत गवताला वणवा लागला होता. मात्र मंगळवारी वार्याचे प्रमाण जास्त असल्याने वणवा गोविंद घवाळी यांच्या बागेतही शिरला.
आपली लागती काजू झाडे होरपळतील यासाठी गोविंद घवाळी आग विझविण्याचा प्रयत्न करत होते. मात्र वार्याच्या वेगामुळे सुकलेले गवताने भडका घेतला. उन्हाच कहर त्यामध्येच आगीच्या ज्वाला. त्यामुळे उष्ण वातावरण तयार झाले होते. अशातच आग विझविण्याचा प्रयत्न करणार्या गोविंद घवाळी यांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. त्यांच्या चप्पल दुसर्या ठिकाणी पडल्या होत्या. त्यामुळे त्यांनी होरपळल्यानंतर स्वत:ला वाचविण्याचा प्रयत्न केला. अखेर काजूच्या झाडाखालीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
या घटनेची माहित स्थानिक ग्रामस्थांनी ग्रामीण पोलीसांना दिली. त्यांनतर सहाय्यक पोलीस निरिक्षक श्री.सुर्य, हवालदार श्री.जोशी, श्री.कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. तर घटनेची माहिती मिळताच सरपंच जितेंद्र तारवे, ग्रामविकास अधिकारी दिपक पाल्ये, तलाठी सुविधा वाडकर, पोलीस पाटील शर्वरी सनगरे यांनी घटनास्थळी भेट देवून पोलीसांना सहकार्य केले. या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद पोलीसांनी घेतली आहे.