रत्नागिरी:- देश विकसित करण्याची वेळ आली आहे. भारत जगात प्रथम क्रमांकाचा देश करण्यासाठी नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणे आवश्यक आहे. पूर्ण बहुमतातील सरकार आल्यानंतरच देश विकसित होईल. कलम ३७०, तीन तलाक, नक्षलवाद, आतंकवादाला पाठिंबा देणाऱ्यांच्या मांडीवर जाऊन नकली शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बसले आहेत. आता ते स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव घेण्याची हिंमत करणार नाहीत. नकली शिवसेनेला कोकणातून हद्दपार करत देशाला विकासाच्या दिशेने नेण्याची हिंमत असलेल्या नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांना लोकसभेत पाठवा असे आवाहन केंद्रीय गृह, सहकार मंत्री तथा भाजपचे राष्ट्रीय नेते अमित शहा यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मतदारांना केले.यावेळी रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो मतदार व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या रत्नागिरीतील जाहीर प्रचारसभेत ना. शहा बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे, उद्योगमंत्री ना. उदय सामंत, सार्वजनिक बांधकाममंत्री ना. रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षणमंत्री ना. दीपक केसरकर, भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे, आमदार शेखर निकम, आमदार नितेश राणे, माजी खासदार आनंदराव अडसूळ, माजी खासदार निलेश राणे, भाजपा नेत्या चित्रा वाघ, शिवसेनानेते किरण सामंत, माजी आमदार बाळासाहेब माने, प्रमोद जठार, विनय नातू, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह सतिश शेवडे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, शिवसेना शह- रप्रमुख बिपीन बंदरकर, प्रदेश पदाधिकारी चित्रा चव्हाण, जिल्हाध्यक्षा सौ. सुजाता साळवी, जिल्हा सरचिटणीस उमेश कुलकर्णी यांच्यासह शिवसेना, भाजप,
राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ना. राणे यांच्या प्रचारासाठी आलेल्या केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी आपल्या भाषणात श्री. उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत जोरदार टीका
केली. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या ज्वलंत विचारांसाठी भाजपसोबत युती केली होती. बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वान् शाबत कधीही तडजोड केली नाही. आज त्यांचे हेच हिंदुत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे चालवत आहेत. तर बाळासाहेबांच्या घरात जन्मलेले उद्धव ठाकरे आज काँग्रेसच्या चरणावर बसल्याची टीका ना. शहा यांनी केली.
गेली अनेक वर्षे या देशाचे नेतृत्व काँग्रेसकडे होते. देशाचे प्रधानमंत्री, अर्थतज्ञ होते तरीही देशाची अर्थव्यवस्था अकराव्या क्रमांकावर येऊन थांबली होती. दोनवेळा देशाचे पंतप्रधान झालेल्या नरेंद्र मोदींनी भारताची अर्थव्यवस्था जगात अकराव्या क्रमांकावर पाचव्या क्रमांकावर आणली आहे. पहिल्या तीन क्रमाकांमध्ये भारताला स्थान मिळवण्यासाठी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. ती आपण पूर्ण कराल याची खात्री आपल्याला असल्याचे ना. अमित शहा यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काश्मीरमधील ३७० कलम हटवल्यानंतर काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे म्हणतात, काश्मीरमधील कलम हटवल्याचा कोकणातील लोकांना काय फायदा? परंतु त्यांना माहीत नाही रत्नागिरी, सिंधुदुर्गतील लोकं आपल्या प्राणांची आहुती द्यायला तयार आहेत. मुख्यमंत्री होण्यासाठीच उद्धव ठाकरे यांनी कलम ३७० हटवायला विरोध करणाऱ्या काँग्रेस, शरद पवारांशी हातमिळवणी केली. देशाच्या विकासाला विरोध करणाऱ्या काँग्रेससोबत जाणाऱ्या उद्धव ठाकरेंना कोकणी जनता कदापीही माफ करणार नाही असे ना. शहा यांनी सांगितले. काँग्रेसने राम मंदिराचा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित ठेवून त्यावर मतांचे राजकारण केले. परंतु दुसऱ्यांदा पंतप्रधान झालेल्या नरेंद्र मोदींनी सुप्रीम कोर्टात राम मंदिराची केस जिंकून मंदिराची पायाभरणी करत उभारणीही केली. त्यानंतर राम प्रतिष्ठापना सोहळा अख्ख्या जगाने पाहिला. राम मंदिर उभारण्याची हिंमत फक्त नरेंद्र मोदीच करू शकतात. आपल्याला अनेक वर्षात जे जमले नाही ते नरेंद्र मोदी करत असताना त्याला केवळ विरोध करण्याचे काम राहुल बाबा व शरद पवारांनी केले आहे. दुर्दैवाने त्यांच्या चरणावर उद्धव ठाकरे जाऊन बसले आहेत. त्यामुळे खरी शिवसेना कोणाची ? हे ठरविणारी ही लोकसभेची निवडणूक असल्याचेही नाही. असे शहा म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केवळ प्रलंबित प्रश्न सोडविले नाही तर केवळ १० वर्षात कोट्यावधी जनतेला मोफत पुरसे अन्नधान्य, १४ कोटी शौचालये, ११ कोटी गॅस कनेक्शन, ३ कोटी घरे, १३० जनतेला मोफत कोरोना लस देऊन जनतेचे प्राण वाचवले. परंतु त्याच कालावधीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंच्या बगलबच्च्यांनी खिचडीचा घोटाळा करून आपण भ्रष्टाचाऱ्यांच्या सोबत असल्याचे दाखवून दिले आहे. आता या सर्वांना बाजुला करून पुन्हा एकदा देशाच्या विकासाला साथ देण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. या संधीचे सोने करा असे आवाहन ना. शहा यांनी केले. भारतीय जनता पार्टीचा नेता म्हणून ज्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आपण जातो तेथील जनता मला विचारत असते, आम्ही निवडून दिलेल्या खासदाराला तुम्ही मंत्री करणार का ? परंतु रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदासंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तुम्हाला थेट मंत्री दिले आहेत. मंत्री नारायण राणे यांच्या घरातीलच तुम्ही सर्व लोकं आहात. ना. राणे यांची काम करण्याची पद्धत आपल्याला माहीत आहे. कोकणचा उर्वरित विकास करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली नारायणराव राणे निश्चितपणे करतील. त्यांच्या पाठिशी उभे राहून त्यांच्या नावासमोरील कमळ निशाणीचे बटन दाबून त्यांना विजयी करा असे आवाहन ना. शहा यांनी केले.
महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणाऱ्या खासदार विनायक राऊत यांचा पराभव करून डिपॉझिट जप्त करा असे आवाहन केले. सत्ता गेल्यानंतर श्री. उद्धव ठाकरे यांचा तोल ढासळला आहे. हिंदुत्वाशी गद्दारी करून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते. परंतु पद, पक्ष गेल्यामुळे त्यांची अवस्था केविलवाणी झाली आहे. खासदार म्हणून तुम्ही मला दिल्लीत पाठवल्यानंतर रत्नागिरीचा रखडलेला विकास पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली करणार आहोत. आपल्या कामाची पद्धत तुम्हा सर्वांनाच माहीत आहे. कोकणचा कॅलिफोर्निया करण्याचे स्वप्न तुमचे सर्वांचे आहे. परंतु मी असा विकास करेन की कॅलिफोर्नियांनी म्हटले पाहिजे, आम्हाला कॅलिफोर्नियाचा कोकण करायचा आहे, ना. राणे यांनी सांगितले.
शिवसेनानेते तथा उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी सिंधुदुर्गएवढेच मताधिक्क्य रत्नागिरीतील तिन्ही मतदारसंघातून दिले जाईल. गृहमंत्री ना. अमित शहा यांना भेटल्यानंतर ते अजुनही जमिनीवर आहेत याची जाणीव मला झाली. रत्नागिरीला विस्तीर्ण समुद्र किनारा लाभला आहे. येथे आंबा, काजू, मासेमारीबरोबरच पर्यटनातून विकास होऊ शकतो, यासाठी केंद्र सरकारने सहकाराची नवी पॉलिसी कोकणसाठी आणावी. तर येथील बेरोजगारी दूर करण्यासाठी मोठा प्रकल्प कोकणासह महाराष्ट्राला द्यावा असे अशी विनंती ना. सामंत यांनी ना. शहा यांना केली. तर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या भाषणात काँग्रेसचे राहुल गांधी, शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करता मंत्री नारायण राणे यांना लोकसभेत पाठविण्याचे आवाहन उपस्थित मतदारांना केले.