संगमेश्वर:- साडवली सह्याद्रीनगर येथील गौरीविहार परिसरातील घरफोडी प्रकरणी देवरूख पोलिसांनी मंगळवारी नागरिकांची बैठक घेत सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. तसेच सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले आहेत.
साडवली सह्याद्रीनगर येथील ‘गौरीविहार परिसरातील बंद बंगले चोरट्यांनी फोडल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. २ बंगल्यातील मिळून ९३ हजार ५०० रूपयांचा ऐवज लंपास केला. तर ४ बंगल्यात चोरीचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले. याची माहिती मिळताच देवरूख पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहणी व पंचनामा केला. चोरीचा छडा लावण्यासाठी श्वानपथक, ठसेतज्ज्ञ व फॉरेंन्सीक टीमला पाचारण केले होते. याचवेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी घटनास्थळी भेट देवून परिस्थितीची पाहणी केली. मंगळवारी सकाळी या परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले. खबरदारी म्हणून पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार यांनी परिसरातील नागरिकांची बैठक घेतली. या परिसरात सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही लावावेत, असे पोलीस निरीक्षक पोवार यांनी सूचित केले.