रत्नागिरी:- एकीकडे सोमवारी सर्वत्र रक्षाबंधनाचा उत्साह असताना दुसरीकडे चिमुकल्या बहीण-भावाला कोरोनाने गाठले. अवघ्या आठ वर्षांची बहीण आणि सहा वर्षांच्या भावाचा कोरोना अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आला. रक्षाबंधनाच्या दिवशीच दोन चिमुकल्या बहीण भावाला उपचारासाठी कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रत्नागिरी शहरासह तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. अशातच कोविड योद्धे म्हणून काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना कोरोनाची लागण होऊ लागल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
पोलीस लाईन येथे वास्तव्यास असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याच्या दोन लहान मुलांसह पत्नीला कोरोनाची लागण झाली आहे. रक्षाबंधन दिवशी या दोन चिमुकल्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.