दापोलीत हुडहुडी भरवणारी थंडी; पारा 8.9 अंशावर

रत्नागिरी:- सलग दुसर्‍या दिवशी दापोलीत पारा घसरला आहे. 10.8 अंशावरुन मंगळवारी 8.9 अंशावर घसरला आहे. त्यामुळे थंडीचा कडाका वाढला असून पर्यटकांसाठी ही पर्वणीच ठरली आहे. दापोली वगळता अन्य तालुक्यातही पारा एक अंशाने खाली आला आहे.

गेले दोन दिवस मतलई वारे वाहू लागले आहेत. या वार्‍याबरोबर थंडीनेही रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश केला आहे. रविवारी (ता. 20) सायंकाळपासून थंडीला सुरवात झाली होती. मध्यरात्री कडाका वाढला.गेले अनेक दिवस दापोलीतील थंडी गायब झाली होती, त्यानंतर अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने थंडी जवळपास गायबच होऊन ढगाळ वातावरण निर्माण होउन अनेक ठिकाणी पाऊसही पडला होता. गेले दोन दिवस दापोलीत गारठा पडला होता. 19 डिसेंम्बरला किमान तापमान 14.9 सेल्सिअस तर 20 तारखेला ते 12.5 सेल्सिअस पर्यंत खाली आले. काल रात्री ते 10.4 अंशापर्यंत खाली आले. काल सायंकाळपासून हवेत गारवा निर्माण झालेला होता.आज मॉर्निंग वाँकला जाणारी मंडळी स्वेटर व कानटोपी घालूनच घराबाहेर पडल्याचे आढळून आले.

राजापूर, लांजा, रत्नागिरी, संगमेश्‍वर, चिपळूण, गुहागर, खेड तालुक्यात पारा 18 अंशापर्यंत खाली आला. पंधरा दिवसांपूर्वी दापोलीत 11.5 अंश सेल्सिअपर्यंत पारा घसरलेला होता. गेल्या दहा वर्षात सर्वात कमी 7 अंशापर्यंत तापमानाची नोंद झाली होती. या तालुक्यात कमाल तापमान 32.2 अंश सेल्सिअस तर अन्य तालुक्यात हेच तापमान 34 अंशापर्यंत होते. थंडीचा कडाका पुढील चार दिवस असाच कायम राहील, अशी शक्यता दिसत आहे. थंडीमुळे अनेक गावांवर धुक्याची दुलई पांघरलेली होती. गावागावात शेकोट्या पेटलेल्या होत्या. जिल्ह्यातील 90 टक्के कलमांना पालवी आली आहे. थंडी अशीच राहिल्यास मोहोर लवकर येईल. त्यासाठी किमान तापमान सलग 15 दिवस टिकून राहणे आवश्यक आहे.

अरबी समुद्रातील चक्राकार वार्‍यांमुळे पुढील काही दिवस वातावरणात चढ-उतार निर्माण होण्याची शक्यता आहे. चक्राकार वार्‍यांनी तापमान घसरू लागले आहे. ही परिस्थिती पुढे किती दिवस राहील याचा अंदाज करणे अशक्य आहे. चढ-उताराचे वातावरण राहिले तर ते आंबा बागांना लाभदायक नाही. पारा खाली घसरत राहणे हापूससाठी पोषक आहे. पाऊस लांबल्यामुळे यंदा 90 टक्केपेक्षा जास्त झाडांना पालवी आलेली आहे. ती जून होऊन पुढे मोहोर येण्यासाठी थंडीची आवश्यकता होती; परंतु डिसेंबर सुरू झाला तरीही ढगाळ वातावरण आणि पाऊस अशीच परिस्थिती होती. आता वातावरण बदलले असून रत्नागिरी, चिपळूणसह राजापूरमध्ये पारा सलग दुसर्‍या दिवशी 18 ते 19 अंशापर्यंत आहे. दापोलीसारखी परिस्थिती एखादयाच ठिकाणी आढळते. सलग तिसर्‍या दिवशी पारा एक अंशाने खाली येत आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर हापूसच्या कलामांना लवकर मोहोर येईल. अन्य तालुक्यात पारा कमी झालेला नाही. गुहागर, मंडणगड, रत्नागिरी, संगमेश्‍वर, राजापूर, लांजा तालुक्यात हापूसला पोषक स्थिती आहे. थंडी सलग 15 दिवस स्थिर राहिल्यानंतर पारा चढू लागल्यास आंब्याला मोहोर लवकर येईल; मात्र पुन्हा उष्मा वाढल्यास पुनर्मोहराची शक्यता वाढते. फेब्रुवारीत दरवर्षी ही परिस्थिती निर्माण होते. यंदाही पुनर्मोहर दिसत आहे. वातावरण पोषक राहिले तर जानेवारीच्या दुसर्‍या पंधरवड्यात आंब्याला चांगला मोहोर येईल असा अंदाज आहे.