दांडेआडोम येथील घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणी सोलर प्रकल्प उभा राहणार 

ना. सामंत; 15 कोटी रुपयांचा निधी

रत्नागिरी:- तालुक्यातील दांडेआडोम येथील पालिकेच्या जागेतील घनकचरा प्रकल्प रद्द झाल्यानंतर त्या जागी १५ कोटी रुपये खर्च करून सोलार प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यातून पालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला वीजपुरवठा केला जाईल. त्यामुळे दोन्ही शासकीय कार्यालयांचे लाखो रुपये वीज बिल वाचणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी  दिली. 

पालिकेचा घनकचरा प्रकल्प वर्षानुवर्षे जागेविना रखडला आहे. गेल्या चार ते पाच टर्म झाल्या तरी घनकचरा प्रकल्प उभारण्यात पालिकेला यश आलेले नाही. अखेर कुठेच जागा मिळत नसल्याने पालिकेने दांडेआडोम येथील आपल्या मालगीच्या सुमारे १५ एकर जागेवर घनकचरा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला; मात्र याला दांडेआडोम येथील ग्रामस्थांनी विरोध केला. विरोध डावलून काम करण्याचा निर्णय पालिकेने घेतल्यानंतर दांडेआडोम ग्रामस्थ न्यायालयात गेले. न्यायालयातही काही वर्षे हे प्रकरण होते. गेल्या वर्षीच त्यावर निर्णय झाला आणि पालिकेच्या बाजूने हा निकाल लागला. तरी ग्रामस्थांचा विरोध कायम होता. अखेर ग्रामस्थांचे मन राखण्यासाठी आणि राजकीय हिताच्यादृष्टीने  या जागेत होऊ घातलेला घनकचरा प्रकल्प रद्द करण्यात आला. त्या ऐवजी एमआयडीसीतील जागा घेऊन तेथे हा प्रकल्प करण्याचा निर्णय झाला. तसा प्रस्ताव पालिकेने एमआयडीसीला दिला आहे; मात्र अजून त्यावर निर्णय झालेला नाही.

याबाबत बोलताना उदय सामंत म्हणाले, दांडेआडोम येथील घनचकरा प्रकल्प रद्द केला आहे. एमआयडीसीकडे जागेचा प्रस्ताव गेला असून तो वरिष्ठ कार्यालयाला पाठवण्यात आला आहे. त्यामुळे दांडेआडोम येथील १५ एकर जागेमध्ये आता १५ कोटीचा सोलार प्रकल्प उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसे झाले तर पालिका विजेबाबत स्वयंपूर्ण होईल. दरमहा येणारे सुमारे अडीच लाख बिल वाचेल. जिल्हाधिकारी कार्यालयाला वीज पुरवठा करण्याचा विचार आहे. त्यांचेही लाखोचे बील वाचणार आहे.