त्या आरोपांमुळे मच्छीमारांची प्रतिमा मलिन झाली

रत्नागिरी:- जिल्ह्यातील कोणत्याही पर्ससीन नेट मच्छिमार नौका मालकांकडून शिवसेना नेते किरण उर्फ भैय्या सामंत यांनी कधीच आर्थिक अपेक्षा केलेली नाही. उलट तेच आम्ही समस्या घेऊन गेल्यानंतर त्या सोडवण्यासाठी स्वत:च्या खिशातून खर्च करतात. अशा दिलदार नेत्यावर अनधिकृत पर्ससीन नेट मालकांकडून दरमहा हप्ता वसूल केला जात असल्याचा आ. नितेश राणे यांनी केलेला आरोप बिनबुडाचा आहे, असे पर्ससीन मच्छिमार नेते विकास उर्फ धाडस सावंत व नासीर वाघू यांनी पत्रकारांना सांगितले.

आ. नितेश राणे यांनी पर्ससीन नेट मच्छिमारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मच्छिमारांसह कोणाचीही प्रतिमा मलिन करू नये. त्याचबरोबर कोणत्याही अधिकार्‍यांनासुद्धा आमचे मच्छिमार हप्ता देत नाहीत, असेही या मच्छिमार नेत्यांनी सांगितले. भाजपचे आ. नितेश राणे यांनी शिवसेना नेते किरण सामंत हे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनधिकृत पर्ससीन नेट नौका मालकांकडून दरमहा प्रत्येकी 10 हजार रूपये वसूल करतात, असा आरोप केला आहे. त्याचबरोबर मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांच्याकडेही लेखी तक्रार केली आहे. या आरोपावर पर्ससीन नेट मच्छिमार नेत्यांनी पत्रकारांसमोर खुलासा केला.

कॅबिनेट मंत्री उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत हे सदैव मच्छिमारांच्या अडचणी सोडवण्यासाठी सहाय्य करतात. याकामी येणारा खर्चही ते स्वत:च करतात. अशावेळी त्यांच्यावर नाहक आरोप करू नयेत, असा सल्लाही मच्छिमार नेत्यांनी दिला आहे.

भाजपचे आ. नितेश राणे यांनी मेहरबानी करून मच्छिमारांना आपल्या राजकीय स्वार्थासाठी राजकारणात गोवू नये. आधीच मच्छिमारांची परिस्थिती हालाखीची आहे. पारंपरिक आणि पर्ससीन नेट मच्छिमारांमध्ये वाद लावून देऊ नये. त्याचबरोबर प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करू नये, असेही मच्छिमार नेते धाडस सावंत आणि नासीर वाघू यांनी सांगितले. आमचे मच्छिमार कुठल्याही अधिकार्‍यांनासुद्धा हप्ता देत नाहीत. अनधिकृत नौका आणि एलईडी प्रकाशात मासेमारी करणार्‍या नौकांवर कारवाई करण्यास आमच्या दोन्ही संघटनांची कोणतीही हरकत नसल्याचेही त्यांनी सांगितले.