तोक्ते वादळाचा रत्नागिरी तालुक्याला दणका; तीसपेक्षा अधिक गावे बाधित तर शेकडो घरांचे नुकसान

रत्नागिरी:-तोक्ते चक्रीवादळाच्या सिंधुदुर्गनंतर रत्नागिरीला फटका बसण्यास रविवारी सकाळपासून सुरुवात झाली. राजापूरमधील आंबोलगड येथून रत्नागिरीच्या दिशेने सायंकाळी साडेपाचपर्यंत पोहचले. यावेळी तुफान पाऊस व सोसाट्याच्या वार्‍याने किनारपट्टीवरील गावांना झोडपून काढले. वादळी वार्‍यामुळे फणस, नारळ, आंबा, वडाची झाडे मोडून पडली. रत्नागिरी तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने मानवी जिवीतहानी झाली नसली तरी कोळंबेतील दोन शेळ्यांवर विद्युतभारीत तार पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. सायंकाळपर्यंत किनार्‍यावरील तीसहून अधिक गावे बाधित झाली असून साठहून अधिक घरांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सायंकाळी उशिरा वादळ गुहागर व दापोलीच्या किनारपट्टीकडे सरकले होते.

वार्‍याचा वेग ताशी 40 ते 45 किलोमीटरहून अधिक होता. रत्नागिरीत सायंकाळी चार वाजता वादळाचा प्रारंभ झाला. समुद्र खवळल्यामुळे किनार्‍यावरील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण होते. या वादळामुळे किनारपट्टीवरील नागरिकांना फयान व निसर्गच्या आठवणी जागृत झाल्या. अनेक ठिकाणची झाडे कोसळली. पाऊस आणि वादळीवार्‍यामुळे वातावरण धुसर झाले होते. त्यातच आंब्यांच्या झाडांवरील आंबे गळून पडल्याने बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे.