तरुणाची २४ लाखांची फसवणूक करणाऱ्याला हरियाणातून अटक

खेड:- नामांकित कंपनीत गुंतवणूक करून जादा परताव्याची रक्कम मिळवून देण्याचे आमिष दाखवत शहरातील एका तरुणास २४ लाख ८५ हजार रुपयांचा ऑनलाईन गंडा घालणाऱ्या भामट्याच्या येथील पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हरियाणातून मुसक्या आवळल्या. नीरज महेंद्र जांगरा (२२ चंदिगढ -हरियाणा) असे भामट्याचे नाव आहे. त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

१९ ते २४ मे २०२४ या कालावधीत शहरातील एका तरुणास ए आरके या व्हॉट्सअप ग्रुपवरून संदर्भातील संदेश पाठवून कंपनीत गुंतवणूक केल्यास ज्यादा रकमेचा परतावा मिळवून देतो, असे सांगत विश्वास संपादन करून अज्ञात व्यक्तीने तरुणाच्या सहा वेगवेगळ्या बँक खात्यातून २४ लाख ८५ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली होती. ज्यादा रकमेचा परतावा न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलीस स्थानक गाठत तक्रार नोंदवली. पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी तपासाला गती दिली. पोलीस तपास पथकाद्वारे अधिक माहिती घेत फसवणुकीतील रक्कम अन्य ४३ बैंक खात्यात वळवण्यात आल्याचे व पुढे २२ वेगवेगळ्या खात्यात वळवण्यात आल्याबाबत माहिती समोर आली होती. यातील ४ लाख ५० हजार रुपयांची रक्कम चंदिगढ व जोधपुर येथील एटीएमचा वापर काढण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.

त्यानुसार पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी एक पथक चंदिगढ व जोधपूर-राजस्थान या राज्यांमध्ये पाठवले. या पथकाने बैंकेतील सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजच्या तपासात एटीएममधून पैसे काढणाऱ्या व्यक्तीबाबत माहिती घेतली असता एक व्यक्ती व्यसनाच्या लोभापोटी अन्य व्यक्तीच्या सांगण्यावरून एटीएममधून पैसे काढून त्याच्या ताब्यात देत असल्याचे निष्पन्न झाले. तांत्रिक विश्लेषणाच्या पथकाने व्यक्तीचा शोध घेतला असता मुख्य सूत्रधार नीरज महेंद्र जांगरा याला जेरबंद केले. पथकात सहायक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक गोरे, पोलीस कॉन्स्टेबल वैभव ओहोळ, पोलीस शिपाई रूपेश जोगी, सुमित नवघरे, शिरीष साळुंखे, तांत्रिक विश्लेषण शाखेचे पोलीस हेडकॉन्स्टेबल रमिजा शेख, सायबर क्राईमचे पोलीस सौरभ कदम यांचा समावेश होता.