ड्रोनद्वारे गावठाणाच्या सर्वेक्षणासाठी कर्मचाऱ्यांची कमतरता 

रत्नागिरी:- ड्रोनद्वारे गावठाणाच्या सर्वेक्षणासाठी कर्मचारी कमी पडत असल्याने इतर जिल्ह्यातील कर्मचार्‍यांच्या सेवा वर्ग केल्या जात आहेत. याला कर्मचार्‍यांनी विरोध केला असून याबाबत जमावबंदी आयुक्तांना निवेदन देऊन नाराजी व्यक्त केली आहे.

कोकणात साडेसात हजार गावे असून तेथील अभिलेखाची माहिती गोळा करण्यासाठी व मालमत्ताधारकांना मिळकत पत्रिका देण्यासाठी गावपातळीवर मालमत्तांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्याचे काम महसूल खात्याने भूमिअभिलेख विभागाद्वारे सुरू केले आहे. कोकणातील पाचही जिल्हा प्रशासनात  महसूल विभागात आतापर्यंत पाच हजार 453 गावांतील गावठाणांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. मात्र आता अपुर्‍या मनुष्यबळाचा फटका या कामाला बसू लागल्याने प्रत्येक जिल्ह्यात इतर जिल्ह्यातून कर्मचार्‍यांच्या सेवा वर्ग केल्या जात आहे. त्यामुळे अनेक  किलोमीटर अंतर कापून कर्मचारी इतर जिल्ह्यात येत आहेत.

या कामात ग्रामविकास विभागाच्या कर्मचार्‍यांची मदत आवश्यक असताना ते सहकार्य करीत नसल्याचा आरोप कर्मचारी संघटनांनी केला आहे. तसेच एका गावाचे काम त्याच दिवशी पूर्ण करण्याच्या नियमाने कर्मचार्‍यांना अतिरिक्त ताणही जाणवत आहे. गावात 500 हून अधिक घरे असतील तर तेथील सर्व प्रक्रिया एकाच दिवशी पूर्ण करणे अशक्य आहे. सुट्टीच्या दिवशी कामाची सक्ती, इतर सुविधांचा अभाव यांकडे कर्मचार्‍यांनी जमाबंदी आयुक्तांचे लक्ष वेधले आहे.  तसेच ड्रोन सर्वेक्षणासाठी मिळणारा निधी खर्च करण्याबाबत उदासीनता आहे. अनेकदा कर्मचारी आवश्यक खर्च स्वत: उचलत असल्याचे जमाबंदी आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
ड्रोनद्वारे सर्वेक्षण करताना यंत्रणा सक्षम आहे का? याची तपासणी करावी. अतिरिक्त कामांमुळे कर्मचार्‍यांच्या मानसिक, शारीरिक स्वास्थ्यावर परिणाम होतो याबाबत विचार व्हावा.  दिवसांचे कामांचे क्षेत्र कमी करावे. गावांची संख्याही कमी करावी, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.