रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात डुप्लिकेट क्रेडिट कार्ड मिळवून वेळोवेळी पैसे काढून सुमारे 8 लाख 85 हजार 29 रुपयांच्या ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. फेडरल बँकेत खाते असलेल्या महिलेच्या बाबतीत मोबाईल लिंकव्दारे ही फसवणूकीची घटना घडली. या प्रकरणी लातूर येथील अज्ञाताविरोधात शहर पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 25 मार्च 2022 ते 14 जून 2022 या कालावधीत मारुती मंदिर येथील फेडरल बँकेच्या शाखेत घडली आहे.
या बाबत फेडरल बँकेच्या शाखेचे व्यवस्थापक सुमित विश्वनाथ बागडिया (35, रा. आरोग्य मंदिर, रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार त्यांच्या बँकेत सायली सचिन पाटील (रा. चिंचखरी, रत्नागिरी) यांचे खाते आहे. त्यांच्या खात्याला लिंक असलेला मोबाईल क्रमांक हा सध्या लातूर येथील अज्ञात व्यक्ती वापरत आहे. त्याव्दारे त्याने सायली पाटील यांच्या नावाच्या क्रेडिट कार्ड लिंकव्दारे पत्ता बदलून तो स्वतःचा लातूर येथील अशोक हॉटेल, अमृता ट्रॅव्हल्स असा केला. तसेच त्याने सायली पाटील यांचे खाते असलेल्या फेडरल बँकेकडे मोबाईल लिंकव्दारे मागणी करुन सायली पाटील यांच्या नावाचे क्रेडिट कार्ड प्राप्त केले. त्या नंतर वेळोवेळी लातूर येथे एकूण 8 लाख 85 हजार इतकी रक्कम काढून अपहार करत बँकेची फसवणूक केली. या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आकाश साळुंखे करत आहेत.