‘डीप क्लिनिंग’ मोहिमेमुळे जिल्ह्यातील गावे झाली चकाचक

रत्नागिरी:-  जिल्हापरिषदेने जिल्ह्यातील 846 ग्रामपंचायतीमध्ये ‘डीप क्लिनिंग’ ही स्वच्छता मोहीम ग्रामस्थांना सोबत घेऊन श्रमदानातून राबविण्यात आली. यामुळे बहुसंख्य गावे चकाचक होण्यास मदत झाली आहे.

जिल्ह्यात प्लास्टिक मुक्त महाश्रमदान स्वच्छता मोहीम किर्तीकिरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी व राहुल देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता), जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या नियोजनाखाली 100 दिवस उपक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्हयामधील 846 ग्रामपंचायतीमध्ये प्लास्टीक मुक्त महाश्रमदान स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली. सर्व तालुक्यातील शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, वर्दळ असणारी ठिकाणे, राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
यामध्ये शासकीय अधिकारी व कर्मचारी, महिला मंडळ, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, बचत गटाच्या महिला तसेच शालेय विद्यार्थी व महाविद्यालयीन विद्यार्थी, लोकप्रतिनिधी यांनी या महाश्रमदान स्वच्छता मोहिमेध्ये भाग घेऊन मोहीम सर्व ठिकाणी यशस्वी केली.

या मोहिमेमध्ये रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे, कुवारबाव व खेडशी ग्रामपंचायतीमध्ये स्वत: किर्तीकिरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी, राहुल देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता), जिल्हा परिषद रत्नागिरी तसेच जे. पी. जाधव, गट विकास अधिकारी, पंचायत समिती रत्नागिरी यांनी सहभाग नोंदविला.

या मोहिमेमध्ये सहभागी सर्व नागरीक, विद्यार्थी यांना स्वच्छता साहित्य उदा.जमिनीवरील पडलेले प्लास्टिक काढण्यासाठी बांबूचे हत्यार, हँडग्लोज, सॅनिटायझर, प्लास्टिक संकलित करण्यासाठी गोणी (पिशव्या), पिण्याची पाण्याची व्यवस्था, चहा, नाश्ता, खाण्यासाठी लेमनच्या गोळ्या इत्यादीची व्यवस्था सर्व ग्रामपंचायतींनी केली. तसेच सहभागी शासकीय अधिकारी व कर्मचारी, महिला मंडळ, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, बचत गटाच्या महिला तसेच शालेय विद्यार्थी व महाविद्यालयीन विद्यार्थी, लोकप्रतिनिधी यांचे किमान 8 ते 10 संख्येमध्ये गट तयार करुन सर्व ठिकाणची प्लास्टिक साहित्य गोळा करण्यात आले. यामध्ये प्रवासी, पर्यटक, वाहनधारक यांच्याकडून प्लास्टिक पिशव्या, बॉटल्स, वेफर्सची व बिस्कीटची पाकिटे इत्यादी प्लास्टिक कचरा गोळा करुन सर्व परिसर स्वच्छ करण्यात आला. या प्लास्टिक कचर्‍यापासून गावागावांमध्ये स्वच्छता निर्माण होऊन गावे स्वच्छ सुंदर होण्यास मदत होईल, असे किर्तीकिरण पुजार यांनी सांगितले.