टायर फुटल्याने ईको कार घुसली सिव्हिल हॉस्पिटल समोरील टपरीमध्ये

रत्नागिरी:- शहरातील मारुती मंदिर ते कोळंबे जाणाऱ्या मोटारीचे स्टेअरिंग लॉक झाल्याने शासकीय जिल्हा रुग्णालय बाजूला रस्त्यावरील येथील चहाच्या टपरीत धुसली. टपरीजवळ असलेल्या पोलवर आदळल्याने या अपघातात चालकासह एकजण जखमी झाला. गंभीर जखमी चालकाला अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे. 

सुर्यकांत अनंत पिलणकर (वय ४५, रा. कोळंबेफाटा, रत्नागिरी) असे गंभीर जखमी मोटार चालकाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. १४) रात्री साडेअकराच्या सुमारास जयस्तंभ येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार चालक सुर्यकांत पिलणकर मोटार (क्र. एमएच-०८ एएक्स ६४६१) घेऊन रात्री मारुती मंदिरहून कोळंबे येथे जात होते. मनोरुग्णालय रस्त्यावर उतारात आले असताना अचानक मोटारीवरील ताबा सुटून मोटारीचे स्टेअरिंग लॉक झाले. पिलणकर यांना गाडी न आवरता आली नाही ती थेट जिल्हा रुग्णलयाच्या बाजूला असलेल्या चहा टपरीवर जाऊन आदळली. ही धडक एवढी जोरदार होती की, त्या ठिकाणी इलेक्ट्रीक पोल होता त्याचा जणू इंद्रधनुष्य झाला आहे. इलेक्ट्रीक वायचा पोल त्या गाडीच्या बॉनेटला कापून आत गेला. यामध्ये चालकाच्या डोक्याला पोल चा मार लागल्याने गंभीर दुखापत झाली. तर मोटारीत बसलेला त्याचा सहकारी महेश दिगंबर चव्हाण (वय ५१, रा. तोणदे, रत्नागिरी) हा देखील जखमी झाला. 

अपघातानंतर रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहन चालकांनी तात्काळ त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. या अपघातात चालक सुर्यकांत पिलणकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे तात्काळ त्याला कोल्हापूर येथे हलविण्यात आले. तर महेश चव्हाण यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेची माहिती मिळाताच शहर पोलिसांनी येऊन पंचनामा केला. शहर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस अमंलदार करत आहेत.