जिल्ह्यातील मळभी वातावरण दूर; तापमानात वाढ

रत्नागिरी:- गेले तीन दिवस असलेले मळभी अवकाळी तूर्तास दूर होऊन गुरूवारी कोकण किनारपट्टी भागातील वातावरण कोरडे झाले. रत्नागिरी जिल्ह्यात बहुतांश भागात गुरूवारी सकाळपासूनच वातावरणात कोरडेपणा आणि मोकळेपणा होता. मात्र पावसाने आकाश निरभ्र केले असले तरी तापमानात मात्र वाढ झाली. सकाळी दहा वाजता जिल्ह्याच्या ग्रामीण आणि शहरी भागात 29 ते 30 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सलग दोन दिवस वातावरणात बदल झाला. बुधवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. काही ठिकाणी हलका पाऊसही झाला. दुपारी सूर्यदर्शन होईल, अशी अपेक्षा होती; मात्र सायंकाळपर्यंत पावसाची शक्यता वाटत होती. मंगळवारपासून सलग दोन दिवस ढगाळ वातावरणामुळे आंबा, काजू बागायतदारांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत होती. मंगळवारी पाऊस पडून गेल्यानंतर दिवसा ऊन पडेल, अशी आशा होती; मात्र बुधवारीही वातावरण मळभाने ग्रासले होते. दोन दिवस वातावरण अनुकूल नसल्यामुळे बागायतदारांना फवारण्यांशिवाय पर्याय उरलेला नाही.
आंब्यावरील मोहोरामध्ये साचून राहिलेल्या पाण्यामुळे बुरशी तयार होऊन तो गळून जाण्याची भीती होती. त्यामुळे बागायती क्षेत्रात तातडीच्या फवारण्यांची लगबग सुरू झाली होती. मात्र गुरूवारी वातावरण कोरडे झाल्याने अनेक आंबा बागायतदारांनी औषध फवारण्या थांबवल्या. मात्र फवारणी केल्यानंतर पुन्हा पाऊस पडला तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही आणि खर्चही वाया जाणार आहे. त्यामुळे खबरदारी घेण्याच्या सूचना कृषी विभागातर्फे करण्यात आल्या आहेत.