रत्नागिरी:- पवित्र पोर्टलद्वारे जिल्ह्यात नियुक्त केलेल्या 1 हजार 14 प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्त्या आचारसंहितेमुळे लांबणीवर गेल्या आहेत. निवडणुक आयोगाच्या परवानगीशिवाय ही प्रक्रिया करता येणार नसल्यामुळे 19, 20 रोजी होणारे समुपदेशन पुढे ढकलण्यात आल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाकडुन सांगण्यात आले. शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी नव्याने नियुक्त शिक्षकांचे समुपदेशन थांबवण्यात आले होते. अखेर ते आचारसंहितेमध्ये अडकले आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधीर रिक्त पदांची संख्या लक्षात घेऊन शासनाने यंदा पवित्र पोर्टलद्वारे भरती प्रक्रिया राबविली होती. जिल्ह्यात 1 हजार 68 जणांना नियुक्त्या दिलेल्या होत्या. त्यामधील 1 हजार 14 पदांवर उमेदवारांची भरती करण्यात आली. ही प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली होती. त्या उमेदवारांना रिक्त शाळांवर नियुक्ती देण्यासाठी समुपदेशन घेण्यात येणार होते. मात्र शाळांमधील रिक्त पदांवर नवीन शिक्षकांना नियुक्ती देण्यापुर्वी जिल्ह्यातील शिक्षकांच्या अंतर्गत बदल्या कराव्यात अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली होती. याची दखल राज्य शासनानेही घेतली. त्यानुसार तीन वर्षे एकाच शाळेत पुर्ण झालेल्या शिक्षकांची जिल्हा आणि तालुकास्तरावर समुपदेशन प्रक्रिया घेण्यात आली. जिल्हास्तरावर सुमारे पावणेदोनशे तर तालुकांतर्गत सुमारे नऊशे शिक्षकांच्या बदल्या झाल्या. ही प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर 19 व 20 मार्चला नवीन उमेदवारांचे समुपदेशन घेण्याचा निर्णय झाला. परंतू याच कालावधीत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहिर झाली. ही प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी अत्यावश्यक असते. त्यामुळे अखेर समुपदेशन पुढे ढकलण्यात आले आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणूक मे महिन्यात संपणार आहे. त्यानंतर समुपदेशन घ्यावे लागणार आहे. तोपर्यंत नवीन उमेदवारांना प्रतिक्षा करावी लागणार आहे. पुढील शैक्षणिक सत्र १५ जुनपर्यंत सुरु होण्याची शक्यता असल्याने समुपदेशन प्रक्रीया झाल्यानंतर त्वरित उमेदवारांना त्या-त्या शाळेत रूजू व्हावे लागणार आहे.