रत्नागिरी:- चिपळूण, लांजा, पाली आणि रत्नागिरी या चार ठिकाणच्या हायटेक बसस्थानकाची कामाची पाहणी करण्यासाठी एसटी महामंडळाचे इंजिनिअरिंग विभागाचे अधिकारी शुक्रवारी रत्नागिरी जिल्हा दौर्यावर आले होते. यावेळी त्यांनी या चारही बसस्थानक बांधकाम कामाचा आढावा घेतला असून, हे काम लवकरात लवकर प्रगतीपथावर जावे यासाठी सूचना देखील केल्या आहेत.
जिल्ह्यातील रत्नागिरी मुख्य बसस्थानकाचे काम संथगतीने सुरू आहे. मध्यंतरी कोरोना काळात जवळपास अडीच वर्षे हे काम बंद होते. ठेकेदारांना कामाचे बजेट वाढवून हवे होते. ही मागणी पालकमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री यांच्याकडे ठेवण्यात आली होती. मुख्यमंत्री यांनी याला मंजुरी दिल्याने बांधकाम पुन्हा सुरू करण्यात आले आहे.
मात्र, ज्या पद्धतीने काम होणं आवश्यक आहे. त्यापद्धतीने काम सुरू झालेले नाही. त्यामुळे एसटी महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयामधून इंजिनिअरिंग विभागाचे अधिकारी बसस्थानक कामाचा आढावा घेण्यासाठी रत्नागिरीत आले होते. पाली, लांजा, चिपळूण यासह रत्नागिरी मुख्य हायटेक बसस्थानक कामाची त्यांनी पाहणी केली.