जिल्ह्यातील आठ पर्यटनस्थळांच्या विकासासाठी 13 कोटी

रत्नागिरी:- पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील 8 पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी 13 कोटींच्या कामाला प्रशासकीय मान्यता दिली आहे. यापैकी 3 कोटी 89 लाख 99 हजार एवढा निधी वितरित करण्यात आला आहे.

जिल्ह्यात अनेक पर्यटनस्थळांकडे पर्यटक आकर्षित होत आहेत. मात्र, या पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा अद्याप पुरविल्या जात नसल्याने पर्यटकांची इच्छा असूनही त्यांना या पर्यटनस्थळी थांबता येत नाही. त्यामुळे पर्यटक फारसे रत्नागिरी जिल्ह्यात न थांबता पुढे सिंधुदुर्ग किंवा गोव्याकडे सुटी घालविण्यासाठी जात असल्याचे दिसून येते. मात्र, जिल्ह्यात पर्यटन वाढावे, इथल्या पर्यटन स्थळांचा विकास व्हावा, या दृष्टीने शासनाच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून जिल्ह्यातील प्रमुख 8 कामांसाठी 13 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यात सात स्थळे रत्नागिरी तालुक्यातील आहेत. तसेच संगमेश्वर तालुक्यातील मार्लेश्वर परिसराचा समावेश आहे. या आठ पर्यटन स्थळांच्या परिसरात पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यास पर्यटकांना या पर्यटन स्थळांचा आनंद घेता येणार आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी राहण्याचा आनंदही मिळणार आहे.
या अंतर्गत देण्यात आलेल्या निधीमध्ये रत्नागिरी तालुक्यातील आरे-वारे बीच 2 कोटी 60 लाख , भाट्ये 2 कोटी 60 लाख, डुगवे लोटेश्वर मंदिर 99.95 लाख 29.98 लाख, काशी वीश्वेश्वर 1.74 कोटी 52.30 लाख, हातीस दर्गा 1 कोटी 71 हजार 30.21 लाख, शिवसृष्टी 1 कोटी 25 लाख 37.50 लाख, काजीरभाटी किनारा 1 कोटी 30 लाख, मार्लेश्वर देवस्थान 3 कोटी 90 लाखाच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे.