रत्नागिरी:- तौक्ते हे नैसर्गिक संकट आहे, या संकटाची भीषणता लक्षात घेऊन जिल्ह्यात 4563 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले असून जिल्ह्यात 1028 घरांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये रत्नागिरी तालुक्यात 200 घरांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत वर्तविला.
तौक्ते चक्रीवादळाने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. निसर्ग चक्रीवादळात काही तालुके उध्वस्त झाले होते. आता त्या पाठोपाठ तौक्तेने तडाखा दिल्याने नुकसानीचा आकडा हा दिवसागणिक वाढू लागला आहे. मच्छिमार, आंबा बागायतदार यासह घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती ना. सामंत यांनी यावेळी दिली. यावेळी बोलताना ना. सामंत यांनी सांगितले की, निसर्ग चक्रीवादळानंतर एसडीआरएफ, एनडीआरएफ यांचे निकष बदलून कोकणात मदत दिली गेली. अशीच मागणी मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचे सांगून निसर्ग प्रमाणे भरपाई द्यावी असे पत्र दिले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यात तौक्ते वादळाचा तडाखा महावितरणला मोठ्या प्रमाणात बसला आहे. अनेक ठिकाणची बत्ती गुल झाली आहे. याबाबत ना. सामंत यांना छेडले असता ते म्हणाले की, महावितरणचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी प्रयत्नशील असून 104 टीम जिल्ह्यात वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी कार्यरत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
निसर्ग चक्रीवादळावेळी किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्याची पुनरावृत्ती होण्याची भीती निर्माण झाली होती. या वादळात कोणतीही जीवित हानी होऊ नये यासाठी जिल्ह्यात 4563 जणांचे स्थलांतर केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने किनारपट्टी भागात स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर रत्नागिरी तालुक्यात 363, दापोली 2373, मंडणगड 508, तर गुहागर 667 जणांचे स्थलांतर करण्यात आले. वेधशाळेच्या सल्ल्यानंतरच त्यांना पुन्हा माघारी पाठविले जाईल असे ना. सामंत यांनी सांगितले.
यावेळी ना. सामंत यांनी जिल्ह्यातील नुकसानीची प्राथमिक आकडेवारी दिली. मंडणगड तालुक्यात 200 घरे, दापोली 350, खेड 30, गुहागर 5, चिपळूण 65, संगमेश्वर 102, रत्नागिरी 200, लांजा 44, राजापूर 32 असे मिळून 1028 घरांचे नुकसान झाल्याची माहिती त्यांनी दिली. तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा जिल्ह्यात चांगलाच बसला आहे. या वादळाने जिल्ह्यातील 21 शासकीय इमारतींचे नुकसान झाले असून 9 शाळा, 14 टपर्या तर 19 गुरांचे गोठे यांचे नुकसान झाले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले तर 8 जण जखमी झाले असून 4 प्राणी मृत झाल्याचे ते म्हणाले.
तौक्ते चक्रीवादळामुळे अनेकांना विद्यापीठाच्या परीक्षा देता आल्या नाहीत यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचे सांगून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणा, मुंबई आदी ठिकाणी ज्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे परीक्षा देता आल्या नाहीत त्यांच्या पुन्हा परीक्षा घेणार असल्याचे ना. सामंत यांनी यावेळी सांगितले. या पत्रकार परिषदेत ना. सामंत यांनी विधानपरिषदेचे आ. प्रसाद लाड, माजी खा. निलेश राणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन यांचे जाहीरपणे आभार व्यक्त केले. जिल्ह्यात कोरोनाचे संकट दूर ठेवण्यासाठी राजकारण बाजूला ठेवून मदतीचा हात पुढे केल्याने प्रशासन देखील त्यांना सर्वतोपरी सहकार्य करेल असे सांगून त्यांनी सार्यांचे आभार मानले.