रत्नागिरी:- पवित्र पोर्टलद्वारे राबवलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या भरतीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे पावणेतीनशे पद भरलेली नाहीत; मात्र शासनाच्या आदेशानुसार आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबविताना पवित्रतील रिक्त पदांवर भविष्यात शिक्षक भरले जाणार असे दाखवूनच जिल्ह्यातील रिक्त पदांची संख्या निश्चित करावयाची आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची पदे साडेपाच टक्के इतकीच रिक्त दिसत आहेत.
प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या दरवर्षी विविध कारणांमुळे वादग्रस्त ठरतात. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांच्याविरोधात अविश्वास ठराव करण्यातील एक मुद्दा हा आंतरजिल्हा बदल्या होता. यंंदा कोरोनाच्या टाळेबंदीमुळे राज्यातील सर्वच बदल्यांची प्रक्रिया शासनाने स्थगित केली होती. काही दिवसांपुर्वी 15 टक्के प्रशासकीय बदल्या 10 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. याबरोबरच आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रियाही राबविण्यात येणार आहे. त्यासाठी शासनाकडून शिक्षण विभागाला सुचना दिलेल्या आहेत. शासनाच्या निर्णयानुसार ज्या जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची संख्या दहा टक्केपेक्षा कमी आहे, तेथील शिक्षकांना बदलीसाठी हिरवा कंदिल मिळणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात परजिल्ह्यातील शिक्षकांची संख्या सुमारे पन्नास टक्के दरम्यान आहे. दरवर्षी यातील काही शिक्षक आंतरजिल्हा बदलीसाठी प्रयत्न करत असतात. गतवर्षी सुमारे दोनशे शिक्षकांना एका रात्रीत सोडण्यात आले होते. त्यावेळी शिक्षकांची रिक्त पद संख्या साडेनऊ टक्के होते. त्यामुळे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची वानवाच होती. त्यानंतर शासनाने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुमारे पाचशे रिक्त पदांसाठी जाहीरात काढली होती. त्यावेळी तिनशे शिक्षक जिल्ह्यात नियुक्त करण्यात आले. उर्वरित 279 पदे शिक्षक येऊ शकलेले नाहीत. त्यामुळे ती पदे रिक्त अजुनही रिक्तच आहेत.