जिल्ह्यात मानधनावर 684 तात्पुरते शिक्षक नियुक्त

रत्नागिरी:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांची जागा भरुन काढण्यासाठी मानधनावर 684 तात्पुरते शिक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. अजुन सोळा शिक्षकांची नियुक्ती केली जाणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. या नियुक्त्यांसाठीही एका शाळेत तिने ते चार अर्ज आले होते.

रखडलेली शिक्षक भरती प्रक्रिया आणि आंतरजिल्हा बदलीने सुमारे सव्वासातशे शिक्षक जिल्ह्याच्या बाहेर गेल्यामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची रिक्त पद दोन हजारावर पोचली. मंजूर पदांच्या तुलनेत 25 टक्केहून अधिक पदे रिक्त राहिल्याने शैक्षणिक गुणवत्ता घसरण्याची भिती व्यक्त केली जात होती. या प्रश्‍नावरुन ठाकरे शिवसेनेकडून आक्रमक भुमिका घेण्यात आली. खासदार, आमदारांसह माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकार्‍यांकडून जिल्हा परिषद अधिकार्‍यांकडे निवेदने देण्यास सुरवात केली. शिक्षकांची तातडीने नियुक्त करा, अन्यथा मुलांना जिल्हा परिषदेत आणून बसवू, असा इशारा दिला होता. त्यानंतर शिक्षण विभागाकडून मानधनावर डीएड, बीएड धारकांना तात्पुरत्या स्वरुपात नियुक्तीचा प्रस्ताव तयार केला. त्याला पालकमंत्री उदय सामंत यांनी पाठबळ देत महिन्याला 9 हजार रुपये मानधन देण्याच्या सुचना केल्या. त्याला निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असेही मंत्री सामंत यांनी सांगितले. त्यामुळे मानधनावर शिक्षक नियुक्तीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीवर सोपवण्यात आली होती. उमेदवार निवडीत गावातील तरुणांना प्राधान्य देण्यात आले आहे. जिल्ह्यात सुमारे सातशे शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार असून आतापर्यंत 684 जणांना मानधनावर काम करण्यास परवानगी दिली गेली आहे. दापोलीत 4 आणि गुहागरमध्ये 12 जणांची निवड प्रक्रिया सुरु आहे. प्रत्येक शाळेत तिन ते चार इच्छुकांचे अर्ज प्राप्त झालेेले होते. त्यामधील एकाची निवड शाळा व्यवस्थापन समितीने केली आहे. ही नियुक्ती नवीन भरती प्रक्रिया राबवेपर्यंत किंवा हे शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत राहणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.