जिल्ह्यात गणेशोत्सवासाठी एसटी सोडणार 2100 बसेस 

रत्नागिरी:- गेल्या दोन तीन वर्षात कोरोनामुळे एसटी पूर्णत: तोट्यात आहे. मात्र, यंदा तिला बाप्पा पावणार आहे. कोरोना पश्चात राज्यात पहिल्यांदाच मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा केला  जाणार आहे. येत्या दोन दिवसात रत्नागिरी एस.टी. विभागाचे गणेशोत्सव नियोजन पार पडणार आहे. जिल्ह्यात तब्बल 2100 बसेस चाकरमान्यांना घेऊन 25 ऑगस्टपासून दाखल होणार आहे.

कोरोना महामारीआधी  गणेशोत्सवात चाकरमान्यांच्या परतीसाठी 1500 ते 1600 गाड्यांचे नियोजन केले जात होते. यंदा लाखोंच्या संख्येने चाकरमानी या आठवड्यात कोकणात दाखल होणार असून या चाकरमान्यांच्या स्वागतासाठी एसटी विभाग सज्ज झाले असल्याची माहिती रत्नागिरी विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी यांनी दिली.

कोकणातील गणेशोत्सवाची परदेशातही कुतुहल आहे, इतक्या मोठ्या प्रमाणावर विशेषत: घरोघरी हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. यासाठी मुंबईतील चाकरमानी लाखोंच्या संख्येने या उत्सवासाठी कोकणात दाखल होणार आहे. ज्याप्रमाणे एसटी विभागाने चाकरमान्यांच्या स्वागतासाठी तयारी सुरु केली आहे त्याचप्रमाणे कोकण रेल्वेही सज्ज झाले आहे. कोकण रेल्वेच्या 272 जादा गाड्या सोडल्या जाणार आहेत तर एसटीच्या जवळपास 1 हजाराहून अधिक गाड्यांचे नियोजन सुरु करण्यात आले आहे. येत्या दोन दिवसात हे नियोजन पूर्ण करण्यात येणार असून एकूण गाड्यांचे वेळापत्रक तयार केले जाणार आहे.

गेल्या पाच सहा महिन्यांपासून एसटीला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी एसटी विभागाकडून विविध प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे यंदा गणेशोत्सवाचे नियोजन हे अत्यंत काटेकोरपणे केले जाणार आहे. चाकरमान्यांच्या स्वागतासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वागत कक्षही एसटी विभागाकडून उभारण्यात येणार आहे. गस्त पथकही नेमण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे गर्दीच्या बसस्थानकाच्या ठिकाणी वाहतूक नियंत्रण, प्रवासी मित्रही लक्ष ठेवून असणार आहे.

यंदाही चाकरमान्यांसाठी परतीच्या प्रवासासाठी गु्रप बुकिंग करता येणार आहे. त्यामुळे थेट गावात जावून चाकरमान्यांना एसटी परतीच्या प्रवासासाठी घेणार आहे, यासाठी प्रत्येक गावातील चाकरमान्यांनी गु्रप बुकिंग करावे, असे आवाहन एसटी विभागाकडून करण्यात आले आहे.