रत्नागिरी:- जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील अकरा शासकीय धान्य खरेदी केंद्रावर भात खरेदी सुरू आहे.या केंद्रांवर आतापर्यंत एकूण ९७१ शेतकऱ्यांकडील २०,९०३ क्विंटल भाताची खरेदी करण्यात आली आहे.
भात विक्रीचे जिल्ह्यातील १३ शेतकऱ्यांच्या खात्यावर १२,५३,९०७ रूपये जमा करण्यात आले आहेत. गतवर्षी जिल्ह्यातील १४ केंद्रांवर ४३ हजार क्विंटल भात खरेदी करण्यात आले होते. यावर्षी ५५ हजार क्विंटल भात खरेदीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. दि. ३१ मार्चपर्यंत भात विक्री करण्याची मुदत देण्यात आली आहे. भात विक्री करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे.
जिल्ह्यातील एकूण ९७१ शेतकऱ्यांनी भात विक्री केली असली तरी आतापर्यंत १३ शेतकऱ्यांच्याच खात्यावर भात विक्रीची रक्कम जमा झाली आहे. उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर टप्प्याटप्प्याने रक्कम जमा होणार असल्याचे सांगण्यात आले. गेली काही वर्षे सरकारकडून दर चांगला मिळत असल्याने भात विक्रीसाठी शेतकरी चांगला प्रतिसाद देऊ लागले आहेत. यावर्षी प्रतिक्विंटल २,३०० रुपये दर शासनाने निश्चित केला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत