रत्नागिरी:- जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात फूट पडू लागली आहे. रत्नागिरी, मंडणगड हे दोन डेपो वगळता उर्वरित डेपोतून एसटीची वाहतूक सुरु झाली आहे. जिल्हाभरात तब्बल 483 कर्मचारी पुन्हा एसटीच्या सेवेत रुजू झाले आहेत. तर बुधवारी दिवसभरात १६८ फेऱ्यांतून प्रवाशांची वाहतुक करण्यात आली. त्यामुळे एसटीचे चाके पुन्हा रस्त्यावर येवू लागली आहे. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनिकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचार्यांनी सुमारे एक महिन्यापुर्वी संपाचे हत्यार उगारले होते.
कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात भाजपा आमदारांनी पुढाकार घेत नेतृत्व केले होते. सरकार बरोबर झालेल्या चर्चेत सरकारने उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीच्या अहवालानंतर विलिनिकरणाचा निर्णय होईल. मात्र त्यापुर्वी सरकारने आपल्या अधिकारात कर्मचाऱ्याच्या पगारात वाढ करत संप मागे घेण्याचे आवाहन केले होते. तर संप मागे न घेतल्यास कारवाई करण्याचा इशारा मंत्री ना.अनिल परब यांनी दिला होता. पगार वाढीचा निर्णय सरकारने जाहिर केल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात राज्य स्तरावर फुट पडली. भाजपा आमदारांनी आंदोलनातून काढता पाय घेतल्यानंतर जिल्हास्तरावरही आंदोलनामध्ये फुट पडू लागली आहे. संघटना विरहित आंदोलन सुरु असल्याने अंतिम निर्णय घ्यायचा कोणी? असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र सरकार आपल्याला कायद्याच्या कचाट्यात अडकवेल अशी शक्यता निर्माण झाल्याने कर्मचाऱ्यांनीही आंदोलनातून काढता पाय घेण्याला सुरुवात केली आहे.रत्नागिरी जिल्हात ४ हजार २७१ पैकी ४८३ कर्मचारी एसटीच्या सेवेत पु्न्हा रुजू झाले आहे. जवळजवळ १० टक्के कर्मचारी सेवेत आल्याने बुधवारी १६८ फेऱ्या विविध मार्गावर सोडण्यात आल्या. त्यामुळे तालुका ते गाव जोडणारी लालपरी पुन्हा ग्रामीण भागातील रस्त्यावर धावू लागली आहे.मंडणगड, रत्नागिरी एसटी डेपोतील कर्मचारी आंदोलनावर ठाम राहिल्याने दोन्ही डेपोतील एकही कर्मचारी एसटीच्या सेवेत हजर झालेले नाही. त्यामुळे रत्नागिरी, मंडणगड तालुक्यातील एसटीची सेवा अजूनही ठप्पच आहे. याचा फटका सर्वसामान्य ग्रामस्थांना बसत आहे. एका बाजूला शाळा सुरु करण्याचा निर्णय होत आहे. अशातच एसटी संप सुरु असल्याने शाळेत जायचे कसे ? असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा राहिला आहे.