कोरोनाचा बॉम्ब; 24 तासात तब्बल 102 पॉझिटिव्ह रुग्ण

एकूण पॉझिटिव्ह 1 हजार 438, 5 रुग्णांचा मृत्यू

रत्नागिरी:-जिल्ह्यात कोरोनाने अक्षरशः थैमान घातल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील 24 तासात तब्बल शंभरपेक्षा अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्यासह कोरोना बळींची आकडा देखील वाढत आहे. जिल्ह्यात नव्याने पाच रुग्णांचा मृत्यू झाला असून कोरोना बळींची संख्या 49 वर पोचली आहे.

नव्याने पॉझिटिव्ह सापडलेल्या रुग्णांमध्ये जिल्हा कोव्हीड रुग्णालय रत्नागिरी येथील 24 रुग्ण, उपजिल्हा रुग्णालय कामथे येथील तब्बल 48 रुग्ण,
दापोली 2 रुग्ण, घरडा खेड 27 रुग्ण आणि लांजा येथील एका रुग्णाचा समावेश आहे.

चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने पाच बळी घेतले आहेत. यात राजापूर येथील एका 65 वर्षीय कोरोना रुग्णाचा, तसेच रत्नागिरी येथे 68 वर्षीय ॲन्टीजेन चाचणीत पॉझिटिव्ह आलेल्या महिला रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. तर खेड येथे 2 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच चिपळूण येथे 49 वर्षीय कोरोना रुग्णाचाही उपचार दरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या आता 49 झाली आहे.

दरम्यान 45 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 858 झाली आहे. गुरुवारी बरे झालेल्यांमध्ये जिल्हा कोव्हीड रुग्णालय 6, कोव्हीड केअर सेंटर केकेव्ही दापोली 3, कोव्हीड केअर सेंटर समाजकल्याण 2, कोव्हीड केअर सेंटर घरडा खेड 21,कोव्हीड केअर सेंटर वेळणेश्वर गुहागर 3 आणि 10 कोव्हीड केअर सेंटर पेंढांबे चिपळूण मधील आहेत.