जिल्ह्यात 1 हजार 28 गावे कोरोनामुक्त 

कोरोनामुक्त गाव मोहिमेचे फलित; 63 हजार 787 चाचण्या 

रत्नागिरी:- जिल्ह्यातील वाढत्या कोरोना बाधितांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने राबवलेल्या कोरोना मुक्त गाव मोहिमेंतर्गत 13 जूनपासून आतापर्यंत 63 हजार 787 चाचण्या करण्यात आल्या. वेळेत कोरोना बाधितांचे ट्रेसिंग होत असल्याने जिल्ह्यातील कोरोना मुक्त गावांची संख्या वाढली आहे. सध्या जिल्ह्यातील 1 हजार 28 गावात एकही कोरोना बाधित नाही. त्यामुळे ही मोहीम 12 जुलै पर्यंत वाढवण्यात आली आहे. 

जिल्ह्यात ‘माझे गाव, माझी जबाबदारी‘ आणि कोरोना मुक्त गाव मोहिम 13 जुन पासुन राबवण्यात आली. या मोहिमेत ग्रामपंचायतींची लोकसंख्या 2000 पेक्षा जास्त अधिक आहे, अशा 212 ग्रामपंचायतीत सौम्य लक्षणे असलेल्या कोवीड बाधितांसाठी विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आली. कोवीड केअर सेंटर, जिल्हा आणि महिला रुग्णालयावरील बाधितांचा भार कमी होणार आहे. तसेच गावातच बाधितांवर उपचार मिळाले आणि आपल्या घरी असल्याची जाणीव होईल. जिल्हयात एकुण 262 विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले. प्रत्येक ग्रामपंचायतीत नियमित टेस्टींग आयोजित करण्यात आले असून दिवसाला चाचण्या घेण्यात येत आहेत. त्याप्रमाणे जिल्हयात कालावधीत आरटिपीसीआर 23 हजार 318 आणि अँन्टीजन 43 हजार 469 असे एकुण 63 हजार 787 चाचण्या करण्यात आल्या. जिल्ह्यात 1 हजार 534 महसुली गावे आहेत. त्यापैकी कोरोनामुक्त गावे म्हणजे 1 हजार 28 आहेत. 1 ते 15 पर्यंत रुग्ण असलेली गावे 453 असुन, 16 ते 24 रुग्ण असलेली गावे 32 आहेत. 25 पेक्षा जास्त रुग्ण असलेली गावे 26 आहेत. मागील आठवड्यात एकही बाधित नसलेली 947 गावे होती. त्यात 81 गावांची भर पडली आहे. कोरोना मुक्त गाव मोहीमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्हयातील प्रत्येक व्यक्तीने जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा कोविड केअर सेंटर मध्ये जावुन चाचणी करुन घ्यावी व योग्य उपचार घ्यावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.