जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीसह कोरोनाबाबत बोगस मेसेज व्हायरल

जिल्हा प्रशासनाकडून कारवाईचे संकेत; मेसेज फॉरवर्ड न करण्याच्या सूचना 

रत्नागिरी:- मागील दोन दिवसांपासून जिल्हा प्रशासनाच्या नावाने बोगस आणि बनावट मेसेज तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत आहे. यात जिल्हाधिकारी यांच्या बदलीसह कोरोना थर्ड स्टेजमध्ये असल्याचा बोगस मेसेज मोठ्या प्रमाणावर फिरवला जात आहे. प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली असुन बोगस मेसेज व्हायरल करणाऱ्यांवर कारवाईच्या कडक सूचना दिल्या आहेत. 

जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची बदली, अर्जुन संकपाळ रत्नागिचे नवे जिल्हाधिकारी, अशी बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली. उपसचिव स. री. बांदेकर देशमुख यांच्या नावे ती बातमी फिरत होती. मात्र हे पत्र आणि बातमी ‘फेक’ आहे. जोवर जिल्ह्यातील कोरोना संपत नाही, तोवर मी जिल्ह्यातून जाणार नाही, असे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सोशल मीडियावर स्पष्टीकरण केल्यामुळे या विषयावर पडदा पडला. 

जिल्हाधिकारी यांची बदली झाल्याचे बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने महसूल विभागात जोरदार चर्चा सुरू झाली. लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या जागी अर्जुन संकपाळ हे नवे जिल्हाधिकारी असतील अशी बातमी रविवारी सोशल मीडियावर फिरत होती. शासनाचे उपसचिव स. री. बांदेकर देशमुख यांच्या नावे ती बातमी फिरली. मात्र काही क्षणातच जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी याबाबत खुलासा करत ही बातमी फेक असल्याचे स्पष्ट केले. जोपर्यंत जिल्ह्यातील कोरोना संपत नाही, तोपर्यंत जिल्ह्यातून जाणार नाही, असेही मिश्रा यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी मिश्रा यांनी 14 फेब्रुवारी 2020 ला जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्विकारला. तत्पूर्वी 3 वर्षे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले होते. कौटुंबिक अडचणीमुळे त्यांनी फेब्रुवारीमध्ये पुण्यात बदली मागीतली होती. मात्र कोरांनामुळे हा विषय मागे पडला.