रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सर्वपक्षीय सहकार पॅनेल तयार करण्यात आले आहे. ही निवडणुक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न असून राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसबरोबर भाजपही समाविष्ट आहे. सहकारात राजकारण नको या हेतूने प्रेरीत होऊन प्रतिकुल राजकीय परिस्थितीमध्ये संपूर्ण राज्यात आदर्शवत प्रयोग रत्नागिरी जिल्ह्यात करण्यात आला आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष आणि पॅनलचे प्रमुख डॉ. तानाजीराव चोरगे यांनी दिली.
बँकेच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती डॉ. चोरगे यांनी दिली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विलास चाळके, किरण सामंत, भाजप जिल्हाध्यक्ष अॅड. दिपक पटवर्धन यांच्यासह अन्य सर्व संचालक उपस्थित होते. डॉ. चोरगे म्हणाले की, सहकारात राजकारण नको यासाठी बँकेची निवडणुक बिनविरोध करण्याचा प्रयत्न सुरु होता. त्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, किरण सामंत यांच्यासह काँग्रेसचे रमेश कीर, राष्ट्रवादीचे बाबाजी जाधव, शेखर निकम, भाजपकडून अॅड. पटवर्धन प्रयत्नशील होते. पक्षातील वरीष्ठांशी चर्चा करुन आज यावर शिक्कामोर्तब करण्यात आला. एकुण 21 जागांपैकी राष्ट्रवादीला 10, शिवसेनेला 6, काँग्रेस 3 आणि भाजपला 2 जागा दिल्या आहेत. यामध्ये बरचसे जुनचे संचालक असून मोजक्याच नव्या चेहर्यांना संधी देण्यात आली आहे. सर्वपक्षीय पॅनलचा प्रमुख या नात्याने बँकेचा कारभार चांगल्या पध्दतीने चालवण्यासाठी प्रयत्नशील आहे. सहकारात वाद नको, निवडणुकीत ताकद वाया घालवण्यापेक्षा त्याचा वापर चांगल्या कामांसाठी करण्याच्या हेतूने सर्व पक्षांना केलेली विनंती त्यांनी मान्य केली. 19 नोव्हेंबरपर्यंत निवडणुक लागण्याची शक्यता आहे. दोन दिवसात कार्यक्रम जाहीर होईल. बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा पॅनलप्रमुख म्हणून माझ्याकडे राहणार आहे. तसेच कोणत्याही पक्षातील व्यक्ती अपक्ष म्हणून राहील्यास त्याला पक्षाचा पाठींबा राहणार नाही असे त्या पक्षाकडून जाहीर करण्याचे निश्चित केले आहे.