रत्नागिरी:- जिल्हा परिषदच्या शाळांच्या सुट्टीचा कालावधी निश्चित झाला असून 2 मे ते 15 जून या कालावधीत सुट्टी असणार आहे. यावर्षी तब्बल 45 दिवस सुट्टी असल्याने मुलांसह शिक्षक आनंदीत झाले आहेत.
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी शासनाने सूचना निर्गमित केलेल्या आहेत. त्या अनुषंगाने राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष 2024-25 सुरू करण्याबाबतच्या सूचना शिक्षण संचालयाने दिल्या आहेत.
त्यानुसार आगामी शैक्षणिक वर्ष 15 जूनपासून सुरू होणार आहे. तर 2 मे पासून उन्हाळा सुट्टीला सुरूवात होणार आहे. यामुळे यावर्षी तब्बल 45 दिवस सुट्टी असणार आहे. जिल्ह्यातील प्राथमिकच्या 2 हजार 500 आणि माध्यमिकच्या 350 अशा जवळपास 2 हजार 850 शाळांना 2 मे पासून शाळांना कुलुपे लागणार आहेत.