रत्नागिरी:- जिल्हा परिषदेच्या मिनी दवाखान्यात हेल्थ एटीएम मशीन दाखल झाली आहे. याद्वारे कर्मचारी, अधिकारी, अभ्यांगत यांच्या आरोग्याची तपासणी होणार आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील 29 ठिकाणी हे मशिन कार्यान्वित करण्यात आले आहे. याचा लाभही नागरिकांना मिळणार आहे.
जिल्हा परिषदेमध्ये काम करणारे अधिकारी व कर्मचारी तसेच कामानिमित्त जि.प. भवनात येणारे अभ्यांगत व पत्रकार यांना आरोग्य सेवा मिळावी या उद्देशाने गेल्या महिन्यात छोटासा दवाखाना थाटण्यात आला होता. या दवाखान्यात डॉ. देविदास चरके हे वैद्यकिय अधिकारी आहेत. दिवसभरात 20 ते 25 जणांची याठिकाणी आरोग्य तपासणी करुन त्यांच्यावर तातडीने प्राथमिक उपचार केले जात आहेत.
त्या दवाखान्यात आता हेल्थ एटीएम मशीन बसवण्यात आली आहे. शुक्रवारपासून या मशीनवर आरोग्य तपासणी केली जात आहे. यामुळे आता कर्मचारी, अधिकारी, पत्रकार, अभ्यांगत यांची मशीनद्वारे तपासणी केली जाणार आहे. या मशीनसाठी तज्ज्ञ कर्मचार्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
शुक्रवारी जि.प. भवनात ही मशीन कार्यान्वित करण्यात आली आहे. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, दवाखान्यातील वैद्यकीय अधिकारी डॉ. देविदास चरके, माध्यम अधिकारी ए.जी. बेंडकुळे, औषध निर्माण अधिकारी डी.व्ही. जाधव, सहाय्यक लेखाधिकारी राजू जाधव, चंद्रकांत सरवदे, शिवा यादव, आरोग्य सेविका कडवईकर यासह कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.
या मशीनबरोबरच जिल्ह्यात अजूनही मशीन दाखल झाली आहे. एकूण 30 मशीन आल्या होत्या, त्यापैकी एक मशीन जिल्हा परिषदेमध्ये उर्वरीत 29 आरोग्य केंद्रात देण्यात आल्या आहेत. यामध्ये मंडणगड-कुंबळे, दापोली-उंबर्ले, पिर्सई, खेड- तळे, कोरेगाव, वावे, लोटे, तिसंगी, गुहागर – आबलोली, हेदवी, तळवली, चिपळूण – रामपूर, शिरगाव, सावर्डे, वहाळ, संगमेश्वर – माखजन, कडवई, साखरपा, रत्नागिरी- कोतवडे, मालगुंड, वाटद, जाकादेवी, पावस, चांदेराई, लांजा- भांबेड, वाडिलिंबू, राजापूर – ओणी, कुंभवडे, धारतळे या आरोग्य केंद्रांचा समावेश आहे. याठिकाणी ही मशीन कार्यान्वित करण्यात आलेली आहे.