जिल्हा परिषदेच्या नव्या इमारतीसाठी 58 कोटी 57 लाखांचा निधी 

अध्यक्ष विक्रांत जाधव यांची माहिती

रत्नागिरी:- जिल्हा परिषद इमारतीसाठी ५८ कोटी ५७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत दिली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ग्रामविकासमंत्री यांच्यासह आमदार भास्कर जाधव यांच्या अनुभवामुळे निधी मिळवून देणे शक्य झाले. तर प्रस्ताव तयार करुन तो साडेपाच महिन्यात मंजूर करवून आणण्यात जिल्हा परिषद अधिकार्‍यांचा मोलाचा वाटा आहे असेही त्यांनी सांगितले.

सायंकाळी उशिरा अध्यक्ष श्री. जाधव यांनी दृकश्राव्य माध्यमाद्वारे ही पत्रकार परिषद घेतली. यावेळी उपाध्यक्ष उदय बने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव यांच्यासह अन्य अधिकारी सहभागी झाले होते. ते म्हणाले, मुख्यमंत्री उध्वव ठाकरे यांनी नऊ महिन्यापुर्वी माझ्यावर विश्‍वास ठेवून अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली. त्याचवेळी विकास हे एकच ध्येय आणि स्वप्न उराशी बाळगुन जिल्हा परिषदेचा कारभार चालवत आहे. अवधीपेक्षा काम किती झालं, किती उल्लेखनीय आहे हे पुढील अनेक वर्ष सर्वाच्या लक्षात रहावे यादृष्टीने पावले उचलत होतो. अध्यक्षपदी बसल्यानंतर जिल्हा परिषद इमारतीसाठी उत्तम आणि सुसज्ज अशी नवीन इमारत उभारण्याचे स्वप्न बाळगले आणि त्यादृष्टीने प्रस्ताव मांडला. परिसराची पाहणी केल्यानंतर जुन २०२१ मध्ये पहिली बैठक झाली. पुर्वीचा तीन मजल्यांचा आराखडा बदलून सुसज्ज इमारतीचा नवीन प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला. त्याला निधी मिळावा यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कौतुकाची थाप दिली होती. तर उपमुख्यमंत्री अजितदादांनी अर्थसंकल्पात तरतूद करण्याचे आश्‍वासन दिले. यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव यांच्यासह बांधकाम अधिकारी श्री. मटपथी, सदस्या सौ. रचना महाडिक यांच्यासह अन्य कर्मचार्‍यांनी महत्त्वाची भुमिका बजावली. यामध्ये वडील आमदार भास्कर जाधव यांचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यांच्या संसदीय कार्यप्रणालीच्या अनुभवामुळे पाठपुरावा करणे मला शक्य झाले. अनेक वर्ष नेतेमंडळींशी असलेल्या संबंधाचाही मला फायदा मिळाला. राज्याच्या अंदाजपत्रकात ८४ कोटी रुपये जिल्हा परिषद इमारतीसाठी शिल्लक होते. त्यामध्ये बारामतीची प्रशासकीय इमारत होणार होती. त्यामधून रत्नागिरीच्या इमारतीला निधी द्या असा आग्रह आमदार भास्कर जाधव यांनी उपमुख्यमंत्री अजित दादांकडे केला. त्यांनीही तो मान्य केला. त्यांनीही तो मान्य केला. सर्वांच्या प्रयत्नामुळे इमारतीचे स्वप्न साकार झाले. उपमुख्यमंत्री यांनीही रत्नागिरीतील मिर्‍याच्या भाषणात भुमीपुजनाला येण्याचा उल्लेख केला आहे. त्यांनी केलेला उल्लेख माझ्यासारख्या तरुण अध्यक्षासाठी कौतुकाची थापच आहे.
नव्या इमारतीची रचना बेसमेंट, तळमजला आणि त्यावर सहा मजले अशी असेल. १० हजार ८० चौरस मीटरचे बांधकाम यामध्ये प्रस्तावीत केले आहे. सर्व विभागांना स्वतंत्र कार्यालये आहेत. सर्वसाधारण सभांसाठी वेगळे सभागृह, उपहारगृह, सुसज्ज महिला कक्ष, व्हीडीओ कॉन्फरन्स, समिती सभांसाठी दोन वेगवेगळी सभागृह, पार्किंग व्यवस्था, लिफ्टची व्यवस्था यामध्ये केली जाईल. त्याचबरोबर सामान्य प्रशासन, वित्त विभाग, बांधकाम, कृषी, समाजकल्याण, शिक्षण यासारख्या महत्त्वाच्या विभागांसाठी स्वतंत्र कक्ष ठेवण्यात येणार आहेत. तसेच उत्पन्न वाढीसाठी नवीन किंवा जुन्या इमारतीमधील तळमजल्यात गाळे तयार करुन ते भाडयाने देण्याचा विचारही सुरु असल्याचे अध्यक्ष जाधव यांनी सांगितले.