रत्नागिरी:- शिवसेनेच्या वरिष्ठांकडून आलेल्या आदेशांचे पालन करत जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांच्यासह विषय समिती सभापतींनी आपले राजीनामे गुरुवारी (ता. 25) सायंकाळी उशिरा अध्यक्ष रोहन बने यांच्याकडे सादर केले; मात्र कोरोनामुळे विद्यमान पदाधिकाऱ्यांना मुदत वाढ मिळेल अशी शक्यता निर्माण झाल्यामुळे पदाधिकाऱ्यांची अपेक्षा कायम राहिली आहे.
कोरोनातील टाळेबंदीचा जिल्हा परिषद कामकाजावर परिणाम झाला होता. त्यामुळे विद्यमान पदाधिकार्यांना मुदतवाढ मिळावी अशी मागणी सुरु होती. त्यादृष्टीने काहींनी फिल्डिंगही लावली होती; परंतु सपंर्क प्रमुख सुधीर मोरे यांनी उपाध्यक्षांसह सभापतींनी आपले राजीनामे अध्यक्ष रोहन बने यांच्याकडे सादर करावेत अशी सूचना दिली. बुधवारी (ता. 24) जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेनंतर पदाधिकारी राजीनामे सादर करतील असा अंदाज होता; परंतु सभा आटोपल्यानंतर सर्वच स्वगृही परतले. ठरल्याप्रमाणे गुरुवारी दिवसभरात राजीनामे न आल्यामुळे मुदतवाढीच्या चर्चेला उधाण आले.
सर्वच पदाधिकारी एकत्रित येऊन अध्यक्षांकडे राजीनामे देणार असल्यामुळे बांधकाम व आरोग्य सभापती बाबू म्हाप, समाजकल्याण सभापती रुतुजा जाधव, महिला व बालकल्याण सभापती रजनी चिंगळे हे दिवसभर जिल्हा परिषदेत उपस्थित होते. उपाध्यक्ष महेश नाटेकर सायंकाळी दाखल झाले तर सुनील मोरे त्यानंतर उशिरा आले. मोरे नियोजित कार्यक्रमामुळे उशिरा आल्याचे समजते. सायंकाळी सर्वच पदाधिकार्यांनी राजीनामे अध्यक्ष बने यांच्याकडे सुपूर्द केले. ही प्रक्रिया लांबल्याने काही काळ संभ्रम होता. दरम्यान, पदाधिकारी राजीनामे आले असले तरीही कोरोना काळातील अडचणींचा विचार करून मुदत वाढ देण्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर विचार सुरु असल्याची माहिती एका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने सांगितल्यामुळे मुदतवाढीची चर्चा कायम राहिली आहे.