जि. प. चे कारभारी आज राजीनामा देणार 

अध्यक्ष पदासाठी विक्रांत जाधव यांच्या नावाची चर्चा; महाविकास आघाडीला स्थान नाही?

रत्नागिरी:- जिल्हा परिषद विषय समिती सभापती आणि उपाध्यक्ष यांचे राजीनामे गुरुवारी अध्यक्ष रोहन बने यांच्याकडे सादर करावयाचे आहेत. नवीन पदाधिकारी निवडीमध्ये महाविकास आघाडीचा फॉर्म्युला अवलंबला जाणार नाहीत; मात्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्यांना स्थान दिले जाणार असल्याची चर्चा शिवसेनेच्या वर्तुळात सुरु आहे.

जिल्हा परिषदेत शिवसेनेेचे प्राबल्य आहे. 55 पैकी 39 सदस्य शिवसेनेचे आहेत. सर्व सदस्यांना पद भुषविण्याची संधी मिळावी यासाठी सव्वा वर्षाच्या कालावधीसाठी निवड केली जात आहे. आतापर्यंत तिन टर्म देण्यात आल्या असून उर्वरित सव्वा वर्षासाठीची निवड होणार आहे. त्यासाठी विद्यमान पदाधिकार्‍यांना राजीनामे द्यावे लागणार आहेत. यासंदर्भात काही दिवसांपुर्वी संपर्कप्रमुख सुधीर मोरे यांनी काही दिवसांपुर्वी रत्नागिरी दौर्‍याप्रसंगी सुचना दिल्या होत्या. त्यानुसार 25 फेब्रुवारीला उपाध्यक्ष महेश नाटेकर, शिक्षण व अर्थ सभापती सुनील मोरे, आरोग्य व बांधकाम सभापती बाबू म्हाप, महिला व बालकल्याण सभापती रजीन चिंगळे, समाजकल्याण सभापती ॠतुजा जाधव यांचे राजीनामे घेतले जाणार आहेत. या सर्व पदाधिकार्‍यांनी राजीनामे अध्यक्ष बने यांच्याकडे सुर्पूद करावयाचे आहेत.

नवीन पदाधिकार्‍यांची निवड पंधरा दिवसांनी होणार असून इच्छुकांनी फिल्डींग लावण्यास सुरवात केली आहे. राज्यात महाविकास आघाडी असल्यामुळे त्याचा प्रभाव रत्नागिरीतील जिल्हा परिषद निवडीत दिसेल असा अंदाज होता. त्यानुसार काही राष्ट्रवादीच्या सदस्यांकडून प्रयत्न सुरु झाले आहेत. शिवसेना स्वबळावर निवडून आलेली असल्यामुळे तसा विचार नसल्याची चर्चा शिवसेनेच्या वर्तुळात सुरु असून एका पदाधिकार्‍याकडून याला दुजोरा मिळाला आहे; मात्र राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या सदस्यांचा विचार या पदासाठी केला जाऊ शकतो. यावर शिक्कामोर्तब झाला तर नेत्रा ठाकुर यांना उपाध्यक्ष किंवा अन्य पदावर काम करण्याची संधी मिळू शकतो. शिवसेनेकडून सध्या रश्मी झगडे, स्वप्नाली पाटणे, परशुराम कदम, चंद्रकांत मचणेकर, पूजा नामे, लक्ष्मी शिवलकर यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.