जाब विचारल्याच्या कारणातून कामगाराला रॉडने मारहाण

रत्नागिरी:- कंपनीतील प्रमुखांना न विचारता वॉशर मेटनन्सला घेउन जात असताना त्याबाबत जाब विचारल्याच्या कारणातून एका कामगाराने दुसर्‍या कामगाराच्या डोक्यात स्टील रॉड मारुन दुखापत केली. ही घटना शनिवार 20 एप्रिल रोजी रात्री 8.45 वा. मिरजोळे एमआयडीसी येथील एक्झोटिक फूड कंपनीत घडली आहे.

तेजस शेलार (रा.कसोप,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित कामगाराचे नाव आहे. त्याच्या विरोधात श्रीपाद यशवंत कासेकर (36, रा.म्हाडा कॉलनी कुवारबाव,रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, हे दोघेही मिरजोळे एमआयडीसी येथील एक्झोटिक फूड कंपनीमध्ये कामाला आहेत. शनिवार 20 एप्रिल रोजी दुपारी 3.15 वा. सुमारास कंपनीमध्ये काम करताना तेजस शेलार हा डिपार्टमेंट प्रमुखांना न विचारता वॉशर मेंटनन्ससाठी घेउन जात होता.

तेव्हा श्रीपाद कासेकर यांनी त्याला समजावून सांगितले त्याचा राग तेजसने आपल्या मनात ठेवला होता. दरम्यान, रात्री 8.45 वा. सुमारास श्रीपाद कासेकर हे रितेश रावणंग सोबत जेवायला बसले असताना तेजस आपल्या हातात स्टिल रॉड घेउन तिथे आला आणि श्रीपाद यांच्या डोक्यात मागील बाजुस मारुन दुखापत करत ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी संशयिताविरोधात भादंवि कायदा कलम 324, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.