चिपळूण येथे दुचाकीची रिक्षाला धडक; दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल

चिपळूण:- तालुक्यातील आबिटगाव-आबलोली मार्गावर मूर्तवडे-बौध्दवाडी येथे दुचाकीस्वाराने रिक्षाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात चारजण जखमी होण्याची घटना 12 डिसेंबर रोजी दुपारी 1.53 वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकीस्वार, रिक्षाचालक आणि 2 प्रवासी असे 4 जण जखमी झाले. या अपघात प्रकरणी दुचाकीस्वार राजेंद्र यशवंत तेरेदेसाई (50, कोळीसरे) याच्यावर सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लवंश यशवंत पवार हा आपल्या ताब्यातील रिक्षातून प्रवासी मनोज पंडू पंड्ये व दर्शन दत्ताराम गोणबरे यांना घेऊन आबिटगाव ते आबलोलीकडे जात होता. प्रवासादरम्यान मूर्तवडे-बौध्दवाडी थांब्याजवळ दुचाकीस्वार राजेंद्र तेरेदेसाईने भरधाव वेगात दुचाकी चालवून रिक्षाला समोरुन जोरदार धडक दिली. या धडकेत वरील चार जण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातास व स्वतः सह 3 जणांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्या प्रकरणी दुचाकी स्वरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.