चिपळूण:- चिपळूण शहरातील पेठमाप मुकादम मोहल्ला परिसरात महिलेचा खून करुन पुरावा नष्ट करण्यासाठी तिला जाळण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी पोलिसांनी तपासाला वेग दिला असून विविध चार अधिकाऱ्यांची पथके तयार करण्यात आली आहेत. या प्रकरणी आतापर्यंत दहा ते बारा संशियितांची कसून चौकशी करण्यात आली असून त्यांचे जाबजबाब नोंदविण्यात आले आहेत.
पेठमाप मुकादम मोहल्ला येथील गणी मुकादम यांच्य घरामध्ये मृत कुलसूम अस्लम अन्सारी ही महिला मुलगा अरमान अन्सारी याच्यासोबत भाड्याने राहत होती. ती घरामध्ये एकटी असतानाच अज्ञातांनी सोमवारी तिचा खून केला. पोलिसांनी श्वान पथकाच्या साहाय्याने आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू केले. काल मंगळवारी सकाळी कुलसूम अन्सारी यांचा दफनविधी पोफळी सय्यदवाडी येथील कब्रस्थानात करण्यात आला. अद्याप त्यांचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांना प्राप्त. न झाल्याने हा खून कशामुळे झाला तसेच कोणत्या हे अद्याप समजू शकले नाही.