रत्नागिरी:- सलग तिसर्या वर्षी मासेमारी हंगामाच्या सुरवातीलाच बिघडलेल्या वातावरणाचा फटका मच्छीमारांना बसला आहे. यावर्षीचा हंगाम सुरू होताच सलग चार दिवस नौका बंदरात नांगर टाकून उभ्या असून अजून चार दिवस अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. मासेमारी थांबल्यामुळे एक कोटीच्या घरात मच्छीमारांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
पर्ससीननेटद्वारे मासेमारी वगळता ट्रॉलिंग, गिलनेटसह अन्य सर्व प्रकारच्या मासेमारीला 1 ऑगस्टपासून आरंभ होतो. बंदी कालावधी संपल्यानंतर यंदा मासेमारीला पोषक वातावरण होते. पावसाने उघडीप दिली होती, कडकडीत ऊन पडले होते आणि समुद्रही शांत होता; मात्र चारच दिवसात वातावरण बिघडले आणि मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या मच्छीमारांना माघारी परतावे लागले. हर्णै, दाभोळमधील मच्छीमारांनी जयगड, मिरकवाडा येथील बंदरात सुरक्षित ठिकाणी नांगर टाकावा लागला. जिल्ह्यात पर्ससीननेट नौका वगळून सुमारे तीन हजार अन्य प्रकारच्या नौका आहेत. त्यातील सुमारे सातशेहून अधिक नौका सध्या मासेमारीला जाण्यास सज्ज झाल्या होत्या. सुरवातीला जाळ्यात सापडलेल्या बांगड्याला १५० रुपये किलो तर व्हाईट चिंगूळला किलोला ५०० रुपये दर मिळाला होता. ट्रॉलर्सला म्हाकूळ सापडत असून किलोला २५० रुपये दर होता. मासळीला चांगला दर मिळत असल्याने मच्छीमार खुशीत होते; पण निसर्गाने मच्छीमारांना चांगला दणका दिला. सोमवारी सायंकाळनंतर किनारपट्टीवर ताशी 30 किलोमीटरहून अधिक वेगाने वारे वाहत होते. समुद्र खवळल्याने मासेमारीला जाण्यास कोणीच इच्छुक नव्हते. शेकडो नौका बंदरातच उभ्या होत्या.
सुरवातीला एका नौकेला साधारणपणे दहा ते पंधरा हजार रुपयांची मासळी मिळत होती. गेल्या चार दिवसात एक कोटीहून अधिक रुपयांचे नुकसान मच्छीमारी ठप्प झाल्यामुळे सहन करावे लागले आहे. सध्या खाडीतील माशांवर खवय्यांना समाधान मानावे लागत आहे. हवामान विभागाने ११ ऑगस्टपर्यंत मच्छीमारांना सतर्क राहा, असा इशारा दिला होता. रत्नागिरीतील मिरकरवाडा, जयगड, काळबादेवी, कासारवेली, दापोलीतील हर्णै, दाभोळ येथील हजारो मच्छीमारी नौका समुद्रात जाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. श्रावण महिन्यात धार्मिक कार्यक्रमामुळे मासळी विक्री कमी प्रमाणात होते. त्यामुळे दरही कमी असतात. त्याचा फायदा मच्छीमारांना होत नाही.