रत्नागिरी:- निसर्ग चक्रीवादळाचा मोठा परिणाम जिल्ह्यात दिसून आला. बुधवारी पहाटे पासून वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील चार तालुक्यांना वादळी पावसाने झोडपले असून मंडणगड, लांजा, दापोली आणि चिपळूण या चार तालुक्यात 100 मिमिपेक्षा अधिक पाऊस कोसळला आहे.
बुधवारी पहाटे निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात हजेरी लावली. मंगळवारपासून पावसाने हजेरी लावली. बुधवारी पहाटे 3 वाजल्यापासून वाऱ्याचा वेग वाढला. किनारपट्टी भागात तर ताशी 80 ते 90 कि मी वेगाने वारे वाहत होते. अनेक भागात झाडे मोडून पडली. बुधवारी जिल्ह्यात 93.44 च्या सरासरीने 841 मि मी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. यात लांजा तालुक्यात सर्वाधिक 131 मिमी, मंडणगड 130 मिमी, दापोली 125, चिपळूण 102 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. गुहागर 77, खेड 76, संगमेश्वर 73, रत्नागिरीत 40 तर राजापूर तालुक्यात 87 मिमी पाऊस कोसळला.