रत्नागिरी:- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावाकडे पुणे – मुंबईतून येणार्या चाकरमान्यांनी प्रलंबित असलेल्या किसान सन्मान निधीच्यावितरणातील ई- केवायसी व आधार सीडिंग पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक सुनंदा कुर्हाडे यांनी केले आहे.
किसान सन्मान योजनेचा पंधरावा हप्ता आणि राज्य शासनाच्या नमो योजनेचा पहिला हप्ता घेण्यासाठी जिल्ह्यातील 19 हजार 937 शेतकर्यांची ई- केवायसी आणि 30 हजार 470 शेतकर्यांचे आधार सीडिंग प्रलंबित आहे. कृषी विभागातील हा लक्षांक पूर्ण करण्यासाठी मुंबई, पुण्याहून गावाकडे येणार्या चाकरमान्यांना कृषी विभागाने आवाहन केले आहे. या कालावधीत कृषी विभागाकडून गावागावात नोंदणी शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे.
किसान सन्मान योजनेसाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून प्रत्येकी सहा हजार रुपये शेतकर्यांना दिले जात आहेत. त्यासाठी ई-केवायसी आणि आधार सीडींग करणे अत्यावश्यक आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश शेतकर्यांची नोंदणी करणे प्रलंबित आहे. जिल्ह्यातील बहूसंख्य लोक नोकरी, व्यवसायासाठी मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये आहेत. हे चाकरमानी सणासुदीलाच गावाकडे येतात. काहींचे मोबाईल नंबर वारंवार बदलत असल्यामुळे आधारशी मिळत नाहीत. यामुळे ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.