घरफोडी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात रत्नागिरी पोलिसांना यश

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे फाटा येथील बंद घर फोडून 2 हजार 600 रुपयांची रोख रक्कम लांबवणार्‍या कोल्हापूर येथील 4 संशयितांच्या मुसक्या पूर्णगड पोलिसांनी आवळल्या.चोरीची ही घटना शुक्रवार 12 जानेवारी रोजी रात्री 8.15 वा.घडली होती.

अजित रघुनाथ पडीयार,सुनिल शिवराम पडीयार,किशोर गोपी गोसावी,निलेश सर्जेराव गोसावी (सर्व रा.कोल्हापूर) अशी अटक करण्यात आलेल्या चार संशयितांची नावे आहेत.त्यांच्या विरोधात सतिष रामचंद्र गवाणकर (रा.मांडवी,रत्नागिरी) यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.त्यानुसार,त्यांची मेव्हणी रिमा वायंगणकर यांच्या मालकीचे गणेशगुळे फाटा मेर्वी येथे घर आहे.ते घर बंदच असते.संशयितांनी शुक्रवारी रात्री त्या घराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा कोणत्यातरी हत्याराने तोडून घरात प्रवेश केला.त्यानंतर घराच्या बेडरुममधील लोखंडी कपाट व लाकडी कपाटाचे दरवाजे फोडून त्यातील रोख 2 हजार 600 रुपयांची रक्कम लांबवली होती.याप्रकरणी संशयितांविरोधात भादंवि कायदा कलम 457,380,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.