रत्नागिरी:- जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच नगर परिषदेच्या निवडणुकांबाबत अजूनही संभ्रमावस्था आहे. राज्यातील 1 हजार 166 ग्रामपंचायत निवडणुका 13 ऑक्टोबरला जाहीर झाल्या असून, जिल्ह्यातील 51 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यामुळे आता आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांची रंगीत तालीम ठरणार आहे. या निवडणुकीत शिंदे गट विरूद्ध शिवसेना असा सामना रंगणार हे निश्चित आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी शासन पातळीवर हालचाली होत आहेत. आरक्षणाचा कार्यक्रमही जाहीर झाला होता. पुन्हा तो बारगळला गेला. नगरपंचायतीच्या हालचाली होत असतानाच जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठीही प्रशासकीय यंत्रणेकडून गती मिळत असल्याची चर्चा आहे. आरक्षण पुन्हा निघण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती गट व गणांमध्ये फेरबदल होण्याची चर्चा आहे किंवा जैसे थे राहण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषदेचे 62 गट व 9 समितीचे 124 गण आहेत. नगरपंचायत किंवा जिल्हा परिषद; कोणाची निवडणूक आधी होणार, याचे आकर्षण जनतेला आहे. कोणतीही निवडणूक असो रत्नागिरी जिल्ह्यात त्या निवडणुकीचे भवितव्य असते. रत्नागिरीत विचित्र परिस्थिती आहे. कोणी कोणाचा भरवसा देऊ शकत नाही. ऐनवेळी गटतट, सवतेसुभे उभे राहिलेले अनेकवेळा पहायला मिळाले आहेत. कार्यकर्ते एका बाजूला, तर जनता एका बाजूला, असे चित्र अनेकवेळा झालेले आहे आणि ही वस्तुस्थिती आहे.
सध्या रत्नागिरीत नगरपंचायत व जिल्हा परिषद निवडणुकांचे वारे वाहत आहे. दोन्ही निवडणुका एकत्र झाल्या, तर काय होईल, या विषयी जनतेत तर्कवितर्क लढविले जात आहेत. शक्यतो जिल्हा परिषद जानेवारीनंतर होण्याकडे कल असल्याने रत्नागिरी नगरपंचायत घोषणा होऊन निवडणूक दिवाळीच्या धामधुमीत होण्याची शक्यता आहे. रत्नागिरीत निवडणुकीसाठी उघडपणे कोणीही बोलत नाही. बैठका मात्र होत आहेत. नगरपचायतीच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर हालचालींना वेग येणार आहे. रत्नागिरीत कोण कोणाच्या आडून राजकारण करत आहे, हेच अनेकांच्या लक्षात येत नसल्याने काही जण तोंडघशी पडल्याची चर्चा होत आहे. शहरात अनेक गट-तट आहेत, तरीही काहींचा सवतासुभा राहतो. हे अनेकवेळा पहावयास मिळालेले आहे.
मध्यंतरी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद निवडणकीची घोषणा होऊन आरक्षणाने अनेकांच्या स्वप्नांवर विरजण पडले होते. आता पुन्हा प्रभाग रचना होणार का? आरक्षण कसे पडते? कोणाला संधी मिळते आणि कोणता प्रभाग राखीव होतो, याकडेही सर्वांचे लक्ष आहे. नगरपंचायतीच्या निवडणुकीकडे, तर तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. असे चित्र सध्या तरी आहे. इच्छुकांच्या हालचाली गतिमान झाल्या होत्या.
जिल्ह्यातील 51 गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची धुमशान रंगणार आहे. सध्या तरी ग्रामीण भागात सेनेचे वर्चस्व पाहायला मिळते. मात्र गेल्या तीन महिन्यांच्या घडामोडींवरून सेनेत धुसफुशीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिंदे गटात दोन आमदार दाखल झाले आहेत. यामुळे आता ग्रामीण भागातील चित्र बदलणार हे निश्चित आहे.