ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 1600 शस्त्र जमा 

रत्नागिरीः– ग्रमपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर कोणतीहि अनुचित घटना घडू नये याची खबरदारी म्हणून जिल्ह्यातील १६४८ पैकी १६०० शस्त्र पोलीस दलाने ताब्यात घेतली आहे. उर्वरीत शस्त्र येत्या काही दिवसात ताब्यात घेतली जाणार आहेत.

जिल्ह्यात ४८९ ग्रमपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणुक होत आहे. दि.१५ जानेवारीला निवडणुक असल्याने प्रचाराचा धुरळा सर्वच ग्रमपंचायतींमधून उडत आहे. प्रचारासह मतदानाच्यावेळी शस्त्राचा धाक दाखवून त्याचा परिणाम मतदानावर होऊ नये यासाठी राज्य निवडणुक आयोगाच्या सुचनेनुसार परवाना धारक शस्त्र पोलीस स्थानकात जमा करण्याची प्रक्रिया सुरु आहे. जिल्ह्यात १६४८ जणांकडे परवाना धारक शस्त्र आहेत. त्यातील १६०० जणांनी आपली शस्त्रे त्या-त्या पोलीस स्थानकात जमा केली आहेत. त्यामध्ये ५५५ पैकी ५२२ आत्मसंरक्षण, १०९३ पैकी १०७८ शेती संरक्षण शस्त्रांचा समावेश आहे. निवडणुकीपुर्वी शंभर टक्के शस्त्रे जमा केली जाणार आहे. निवडणुकीसह मतमोजणीची प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर संबंधितांना त्यांची शस्त्रे परत केली जाणार आहेत.