गुरांच्या चार्‍यासाठी पंधरा लाखांची तरतूद

रत्नागिरी:- अनियमित पावसामुळे भविष्यात गुरांच्या चार्‍याचा प्रश्‍न गंभीर होऊ नये यासाठी जिल्हा नियोजन मधून पंधरा लाखाची तरतूद करण्यात आली होती. त्यामधून दुभत्या जनावरांसाठी उपयुक्त अशा मका, चवळी आणि शुगर ग्रेसचे एकुण साडेतेरा हजार किलो बियाणे जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडून शेतकर्‍यांना मोफत दिले जाणार आहे.

ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर पूर्णतः ओसरला होता. सप्टेंबर महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यापर्यंत परिस्थिती गंभीर होती. खरीप हंगामातील शेतीवर परिणाम होण्याची भिती व्यक्त केली जात होती. पाण्याअभावी गुरांसाठीच्या चार्‍याचा प्रश्‍नही गंभीर होण्याची शक्यता होती. राज्य शासनाच्या आदेशानुसार चारा निर्मितीसाठीचे नियोजन करण्यास सुुरुवात झाली. जिल्हा पशुसंवर्धन विभाग आणि कृषी विभागाकडून नेपिअर गवत लागवडीसाठी जिल्ह्यातील शेतकर्‍यांना पाच लाख ठोंब्यांचे वाटप करण्यात आले होते. हे गवत लागवड केल्यानंतर दोन महिन्यात ते कापणीयोग्य होते. पुन्हा त्याला पाणी दिले की ते गुरांना देता येते. हे सुमारे दोन वर्षे हिरवा चारा देऊ शकते. कमी पाऊस झाल्यामुळे गुरांना हिरवा चारा मिळण्यात अडचणी येऊ नयेत यासाठी चारा निर्मितीला चालना देण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हा नियोजनमधून 15 लाखाचा निधी मंजूर झाला आहे. यामधून मक्याचे 10 हजार 294 किलो, चवळीचे 2 हजार 142 किलो, शुगर ग्रेसचे 1 हजार 136 किलो बियाणे प्राप्त झाले आहे. ते शेतकर्‍यांना मोफत देण्यासाठी तालुकास्तरावर दिले गेले आहे. यामध्ये पशुपालकाकडे तिन ते चार जनावरे आणि पाण्याची सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे.