रत्नागिरी:- शहरातील धनजीनाका येथे अवैधरित्या गुटखा विक्री केल्याचा आरोप ठेवून दुकानदाराविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. महेंद्र शशिकांत पवार (४२, रा. जोशी पाळंद, रत्नागिरी) असे या दुकानदाराचे नावे आहे. या प्रकरणी सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल झाले होते. त्याच्यावर आरोप निश्चितीसाठी २७ ऑगस्ट २०२४ ही तारीख न्यायालयाने ठरवली आहे.
खटल्यातील माहितीनुसार, शहरातील धनजीनाका येथे अवैधरित्या गुटखा विक्री होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार अन्न व औषध दुकानामध्ये छापा टाकण्यात आला. यावेळी संशयित महेंद्र पवार याच्या ताब्यात ४५ हजार रूपयांचा गुटखा असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना आढळून आले. सर्व मुद्देमाल विभागाकडून जप्त करण्यात आला. अन्न व औषध प्रशासनाकडून या प्रकरणी महेंद्र पवारविरूद्ध रत्नागिरी शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी भादंवि कलम ३२८, १८८ व २७२ नुसार गुन्हा दाखल केला. तपासाअंती न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. या प्रकरणात आरोपांची निश्चिती करण्यासाठी न्यायालयाने २७ ऑगस्ट २०२४ ही तारीख ठरवून दिली आहे. या प्रकरणात सरकारी पक्षाकडून ॲड. अनुपमा ठाकूर तर आरोपीकडून ॲड. निनाद शिंदे हे काम पाहत आहेत.