गावडे-आंबेरे आंबेकरवाडी येथे भावजयीला मारहाण

रत्नागिरी:- तालुक्यातील गावडे-आंबेरे आंबेकरवाडी येथे कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाच्या पत्नीला लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना गुरूवारी सकाळी 8.30च्या सुमारास घडली. या प्रकरणी मारहाण करणाऱ्या संशयिताविरूद्ध पूर्णगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पर्शुराम धर्मा नाटेकर (रा गावडे आंबेरे, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्शुराम नाटेकर व त्यांच्या भावात मागील काही वर्षापासून वाद सुरू होता. 15 जून 2023 रोजी सकाळी पर्शुराम यांची आई व भावाची पत्नी यांच्यात कडाक्याचे भांडण झाले होते. याचा राग येवून पर्शुराम यांनी भावाच्या पत्नीला हाताच्या थापटाने व लाकडी दांडक्याने मारहाण करून शिवीगाळ केली, अशी तक्रार त्यांच्या भावाने पूर्णगड सागरी पोलीस ठाण्यात दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी पर्शुराम नाटेकर याच्याविरूद्ध भादंवि कलम 324, 451, 323, 504 नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास पूर्णगड पोलिसांकडून करण्यात येत आहे.