जिल्हा प्रशासनाचा सुधारित निर्णय
रत्नागिरी:- जिल्ह्यातील गावांमध्ये गावठाणे घोषित करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. गावठाण दर्जा मिळाल्यानंतर तेथे राहणाऱ्या ग्रामस्थांना अनेक फायदे होणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने जमीनधारकाला घर बांधताना एनए परवानगीची आवश्यकता राहणार नाही असा निर्णय जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण 1 हजार 558 महसूली गावे आहेत. जिल्ह्यात यापूर्वी ग्रामपंचायत हद्दीतील एकूण 577 गावांमध्ये गावठाणे घोषित करण्यात आलेली असून, उर्वरित गावांमध्ये गावठाणे घोषित करण्यात आलेली नाहीत. तरी अशा गावांना गावठाणे घोषित करण्याचे प्रस्तावित आहे.
त्यानुषंगाने जिल्हयातील गावांच्या ज्या भागामध्ये, वाडी, वस्ती व सज्यामध्ये पंधरा किंवा त्यापेक्षा जास्त घरे आहेत, अशा क्षेत्रास प्राधान्याने गावठाण घोषित करावयाचे ठरविले आहे. गावठाणे घोषित केल्यामुळे तेथे राहणाऱ्या ग्रामस्थांना अनेक फायदे होणार आहेत. धारकांच्या जमिनीची सारामाफी होणार आहे. गावठाण जमीन धारकाला घर बांधण्याकरीता अकृषिक (एनए) परवानगीची गरज असणार नाही. तसेच घर बांधणीची परवानगी स्थानिक स्वराज्य संस्थेकडून प्राप्त करुन घेता येणार आहे. त्यामुळे जनतेचे श्रम, पैसा व वेळ यांची बचत होणार आहे असे जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, रत्नागिरी यांनी कळविले आहे.
जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीतील गावठाण घोषित करण्याबाबत शासन महसूल व वन विभागाच्या पत्रन्वये जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांच्याकडील पत्रानुसार गावठाण घोषित करण्याबाबत अपर मुख्य सचिव (महसूल) यांनी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
कोकणातील भौगोलिक परिस्थिती पहाता वस्तुस्थितीची पडताळणी करुन महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 122 अन्वये ज्या महसूली गावाला गावठाण नाही अशा कोकण विभागातील गावात गावठाण अथवा व्हिलेज साईट सर्व्हे नंबरसह घोषित करण्याबाबत विशेष मोहीम राबविण्याची कार्यवाही मार्च 2022 अखेर पूर्ण करणे अपेक्षित असून गावठाण घोषित करण्यापूर्वी जनतेच्या हरकती मागवाव्यात. कमी जास्त पत्रक मंजूर झाल्यानंतर अधिकार अभिलेख व नकाशास अंमल घेण्याची कार्यवाही तहसिलदार व उप अधीक्षक भूमी अभिलेख यांनी करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहे.